COVISHIELD: सीरम इंस्टिट्युट ला भारतामध्ये ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीकडून बनवल्या जात असलेल्या कोविड 19 विरूद्ध संभाव्य लसी च्या क्लिनिकल ट्रायल 2, 3 साठी परवानगी
Image used for representational purpose (Photo Credits: IANS)

भारतामध्ये मागील 4-5 महिन्यांपासून हैदोस घालणार्‍या कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी ठोस लस आणि औषधाची सार्‍या जगाला प्रतिक्षा आहे. दरम्यान युके मध्ये ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी  (Oxford University)आणि अ‍ॅस्ट्राझेनका (Astra Zeneca) यांच्या संयुक्त प्रयत्नाने बनवली जाणारी लस आता भारतामध्ये देखील क्लिनिअल ट्रायलसाठी सज्ज आहे. सीरम इन्स्टिट्युटला ( Serum Institute of India) या लसीचं क्लिनिकल ट्रायल फेज 2 आणि 3 साठी ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ़ इंडिया (DCGI)ने आता परवानगी दिली आहे. पुण्याची सीरम इन्स्टिट्युट ही लस निर्माण करण्यामधील आघाडीची कंपनी आहे. सध्या युके मधील कोविड 19 वरील संभाव्य लसीच्या मॅन्युफॅक्चरिंग आणि डिस्ट्रिब्युशनचं काम सीरम इन्स्टिट्युट करत आहे. भारतमध्ये या लसीचं नाव COVISHIELD (SII-ChAdOx1 nCoV-19)असेल.

युके मध्ये काही दिवसांपूर्वीच ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि अ‍ॅस्ट्राझेनकाच्या कोविड 19 विरूद्ध लढण्यासाठी बनवण्यात येणार्‍या लसीचे क्लिनिकल 2 चे रिपोर्ट्स जाहीर करण्यात आले. ते फारच दिलासादायक आहे. ही लस मानवी शरीरात अ‍ॅन्टिबॉन्टीजसोबत टी सेल्स बनवण्यात यशस्वी ठरली आहे. तसेच या लसीचे फार गंभीर दुष्परिणामदेखील नाहीत. त्यामुळे सध्या तिसर्‍या आणि अंतिम टप्प्यामध्ये पोहचलेल्या या लसीकडे जगाचं लक्ष लागलं आहे.

सीरम इंस्टिट्युट ने दिलेल्या माहितीनुसार ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या या संभाव्य लसींची निर्मिती ते भारतासाठी देखील करणार आहेत. सध्या कोट्यावधी लसींचे डोस बनवण्याचं काम सुरू झालं आहे. परंतू त्याआधी आता भारतामध्येदेखील त्याची क्लिनिकल ट्रायल करण्याला सीरम इंस्टिट्युटला आता परवानगी मिळाली आहे.

सध्या भारतात आयसीएमआर आणि भारत बायोटेक यांच्या संयुक्त प्रयत्नाने कोवॅक्सिन या लसीचं क्लिनिकल ट्रायल सुरू आहे. सोबतच अहमदाबादच्या Zydus Cadila ला देखील संभाव्य कोरोना व्हॅक्सिनच्या मानवी चाचणीला परवानगी देण्यात आली आहे.