Covid-19 New Variant: कोरोना महामारी अजून संपली नाही; पुढील प्रकार ओमायक्रॉनपेक्षा अधिक संसर्गजन्य असेल, संभाव्यतः प्राणघातक- WHO
Coronavirus | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

देशात कोरोना विषाणूची (Coronavirus) प्रकरणे झपाट्याने कमी होत आहेत. ओमायक्रॉन (Omicron) प्रकाराचा प्रभाव हा इतर देशांच्या तुलनेत भारतात कमी ठरला आहे. अशा परिस्थितीत जर तुम्ही विचार करत असाल की कोरोनाचा हा शेवटचा प्रकार होता आणि आता या महामारीपासून मुक्ती मिळाली आहे, तर तुमचा विचार कदाचित चुकीचा ठरू शकेल. जागतिक आरोग्य संघटनेच्या शास्त्रज्ञांनी दावा केला आहे की कोरोनाचे अजून नवीन व्हेरिएंट समोर येण्याची शक्यता आहे.

डब्ल्यूएचओच्या कोविड-19 तांत्रिक प्रमुख मारिया वॉन म्हणाल्या की, कोरोनाचे नवीन प्रकार आणखी घातक ठरतील. तज्ञांच्या मते, हे नवीन प्रकार आणखी संसर्गजन्य असतील, कारण ते सध्याच्या ओमिक्रॉनला ओव्हरटेक करून बनतील. हा व्हेरिएंट गंभीर ते मध्यम असा कोणत्याही प्रकारचा असू शकतो. जर ते खूप प्रभावी असतील तर त्याठिकाणी आपली रोगप्रतिकारक शक्ती देखील कमी पडू शकते.

कोणताही विषाणू निसर्गात टिकून राहण्यासाठी स्वतःमध्ये बदल करत राहतो. असे काही विषाणू आहेत ज्यामध्ये फारच कमी बदल दिसून येतात. परंतु काही विषाणू रोग प्रतिकारशक्ती आणि लसीनुसार स्वतःमध्ये बदल करतात. कोरोनाचे डेल्टा आणि ओमायक्रॉन हे असे प्रकार होते. अशा परिस्थितीत पुढील प्रकार धोकादायक ठरू शकतो. जरी ओमायक्रॉनचा प्रभाव भारतात फारसा दिसला नसला तरी इतर देशांमध्ये तो खूप प्रभावी होता. (हेही वाचा: AIIMS रूग्णालयाकडून रुग्णाला दाखल होण्याआधी आणि शस्त्रक्रिया करण्यापूर्वी नियमित COVID-19 चाचणी बंद करण्याची घोषणा)

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार, ओमायक्रॉनला नोव्हेंबरमध्ये एक गंभीर प्रकार घोषित करण्यात आले. तेव्हापासून जगभरात पाच लाख मृत्यू झाले आहेत. याचा आतापर्यंत 130 दशलक्ष लोकांना संसर्ग झाला आहे. ओमायक्रॉनला सुरुवातीपासूनच तो अत्यंत संसर्गजन्य असल्याचे म्हटले आहे. तो अजूनही जगभरात सक्रिय आहे. डेल्टा प्रकाराच्या तुलनेत भारतात याने फारसे नुकसान केले नसले तरी संपूर्ण जगाच्या प्रकरणांवर नजर टाकली तर याच्यामुळे मृत्यु पावलेल्या रुग्णांची संख्या खूप जास्त आहे.