Coronavirus Vaccination: महाराष्ट्र सरकारने कोरोना लसीचे 5 लाख डोस वाया घालवले; Minister Prakash Javadekar यांचा आरोप
Union Minister Prakash Javadekar. (Photo Credits: IANS)

कोरोना विषाणूच्या (Coronavirus) वाढत्या घटनांमध्ये देशात लसीची (Vaccines) मागणीही वाढत आहे. परंतु लसीच्या पुरवठ्याबाबत महाराष्ट्र आणि केंद्र सरकारमध्ये शीतयुद्ध सुरु आहे. राज्यात लसींचा साठा संपत आल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे, दुसरीकडे केंद्राने याबाबत विरोधाभासी माहिती दिली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्यानंतर आता केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर (Union Minister Prakash Javadekar) यांनी, महाराष्ट्र सरकारवर हल्लाबोल केला असून, राज्याने लसचे 5 लाख डोस वाया घालवल्याचा आरोप त्यांनी केला आहे. भाजप कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलताना जावडेकर म्हणाले की, महाराष्ट्र सरकारकडे लसीचे 23 लाख डोस उपलब्ध असल्याची माहिती मिळाली आहे.

महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे आज म्हणाले की, राज्यात कोरोना लसीची कमतरता आहे. यामुळे अनेक लसीकरण केंद्रांवर लसीकरणाचे काम थांबले आहे, लोकांना परत पाठवावे लागत आहे. त्यांनी सांगितले की, केंद्र कोरोना लसीचे 17 लाख डोस पाठवित आहे, परंतु ही संख्या फारच कमी आहे. राज्याला दर आठवड्याला 40 लाख डोस आवश्यक आहेत. अशाप्रकारे कोरोना लसबाबत केंद्र आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात वाद सुरु आहे. आता महाराष्ट्र सरकारने लस बरबाद केल्याचा आरोप केंद्र सरकारने केला आहे.

मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले की, महाराष्ट्रात लसीचे 23 लाख डोस आहेत, जे पुढील 5 दिवसांसाठी पुरू शकतील. प्रत्येक राज्यात कोविड लशीचा 3 ते 4 दिवसांचा साठा आहे. विविध जिल्ह्यांमध्ये ही लस पुरवणे ही राज्याची जबाबदारी आहे. सध्या ही लस इतकी महत्वाची असूनही महाराष्ट्र सरकारने लसीचे 5 लाख डोस वाया घालवले आहेत. (हेही वाचा: आता 11 एप्रिलपासून सार्वजनिक आणि खासगी कार्यलयाच्या ठिकाणीही मिळणार कोरोना विषाणू लस; केंद्राने दिले निर्देश, जाणून घ्या काय असेल अट)

दरम्यान, काल मंत्री हर्षवर्धन म्हणाले होते की, ‘महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींनी लसींच्या कमतरतेबाबत केलेली विधाने मी पाहिली आहेत. महामारीचा प्रसार रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या वारंवार झालेल्या अपयशांवरून दुसरीकडे लक्ष वळविण्याचा हा प्रयत्न आहे. आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाईन वर्कर्सना लस देण्याची महाराष्ट्राची कामगिरी खराब आहे.’