Coronavirus: तेलंगणा सीएम के चंद्रशेखर राव यांचा इशारा; ‘लॉकडाऊनचा नियम मोडून घराबाहेर पडलात तर गोळी घालण्याचे आदेश देऊ’
Telangana CM Chandrasekhar Rao (Photo Credits: PTI/File)

जगातील अनेक देश कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) विळख्यात सापडले आहेत. अशा परिस्थितीत भारतात कोरोना व्हायरसमुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या आता 11 वर पोहोचली आहे. या साथीच्या आजाराच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी संपूर्ण देशात 25 मार्चपासून लॉकडाऊन (Lockdown) जाहीर केले आहे. मात्र जनतेला आवश्यक वस्तू मिळत राहतील असेही सांगण्यात आले आहेत. परंतु याकाळात कोणत्याही व्यक्तीस विनाकारण घराबाहेर पडण्यास मनाई आहे. एनडीटीव्हीच्या एका अहवालानुसार, या काळात नियम न पाळणाऱ्या लोकांसाठी तेलंगणाचे (Telangana) मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (K. Chandrashekar Rao) यांनी कडक इशारा दिला आहे.

लॉकडाऊन दरम्यान जे लोक विनाकारण घराबाहेर दिसतील त्यांना गोळ्या घालण्यात येतील असे त्यांनी म्हटले आहे. के चंद्रशेखर राव पुढे म्हणाले, 'राज्यातील पोलिस जर परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यास अपयशी ठरले, तर सैन्याला पाचारण केले जाऊ शकते. जर लोक नियम मोडताना दिसले, तर त्यांना गोळी मारण्याचा आदेश दिला जाईल. मी जनतेला अपील करीत आहे, कृपया घरातून बाहेर पडू नका.’ (हेही वाचा: Coronavirus: देशातील कोरोना व्हायरस बाधितांची संख्या 562, चाळीस रुग्ण उपचारानंतर बरे, 9 जणांचा मृत्यू)

सीएम चंद्रशेखर यांनी राज्यातील परिस्थितीबद्दल माहिती देताना सांगितले, तेलंगणामध्ये 19,313 लोक परदेशातून परत आले आहेत. त्यांचे सर्व पासपोर्ट जप्त केले जातील व ते वेगळे ठेवले जातील. सध्या अशी काही प्रकरणे समोर आली आहेत, ज्यामध्ये वेगळे ठेवण्यात आलेले लोक पळून जाण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशा लोकांवर पाळत ठेवण्यासाठी अतिरिक्त पोलिस तैनात करण्याचे तसेच त्यांचे पासपोर्ट जप्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच लॉकडाऊन च्या काळात कोणताही भाजीपाला विक्रेता चढ्या दारात भाजी विकताना आढळला तर त्याचा परवाना रद्द केला जाईल. तसेच राज्यातील सर्व दुकाने संध्याकाळी 6 वाजेपर्यंत बंद करण्याचे आदेशही दिले आहेत.