Coronavirus: दिल्लीत दारूच्या किंमती वाढल्या; सरकारने MRP वर लावला 70 टक्के ज्यादा 'स्पेशल कोरोना फी' कर
मात्र राजधानी दिल्ली (Delhi) मधील दारू शौकिनांसाठी वाईट बातमी आहे
गेले कित्येक दिवस लॉक डाऊन (Lockdown) मुळे देशात दारू (Liquor) विकण्यावर होती, आता केंद्र सरकारने आता दारूच्या विक्रीसाठी परवानगी दिली आहे. मात्र राजधानी दिल्ली (Delhi) मधील दारू शौकिनांसाठी वाईट बातमी आहे. दिल्लीत मंगळवारपासून दारू महाग होणार आहे. केजरीवाल सरकारने दारूवर ‘विशेष कोरोना फी’ (Special Corona Fees) आकारण्याचा निर्णय घेतला आहे. एमआरपीवर ही फी 70 टक्के इतकी असेल. दिल्ली सरकारचा हा निर्णय मंगळवारपासून लागू होणार आहे. यापूर्वी हरियाणा सरकारनेही दारूवर कोविड-19 उपकर लागू करून जनतेला जोरदार धक्का दिला होता. अशाप्रकारे लॉकडाउन कालावधीत दारू पूर्वीपेक्षा जास्त महाग होईल.
सोमवारपासून देशात लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरू झाला आहे. कोरोनामुळे, लॉकडाऊन 17 मे पर्यंत दोन आठवड्यांसाठी वाढविण्यात आले आहे. मात्र यावेळी विस्तारित लॉकडाऊनमध्येही अनेक सवलती देण्यात आल्या आहेत. महत्वाचे म्हणजे यामध्ये अल्कोहोल विक्रीलाही मान्यता देण्यात आली आहे. सोमवारपासून देशातील अनेक शहरांमध्ये दारूची दुकाने उघडली गेली. मात्र यावेळी दुकानांच्या बाहेर लांबच लांब रांगा लागलेल्या दिसल्या. दिल्लीच्या बर्याच भागात दारू विकत घेण्यासाठी बरीच गर्दी झाली होती व यावेळी चेंगराचेंगरीही झाली, तसेच सामाजिक अंतराचा नियम मोडला गेला. (हेही वाचा: दारूसाठी दुकांनासमोर सोशल डिस्टंसिंगचा फज्जा: दिल्ली, कर्नाटक, महाराष्ट्रात तळीरामांच्या लांबच लांब रांगा; Watch Video)
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही सोशल डिस्टन्सिंगचे पालन न झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, ‘जर आम्हाला समजले की एखाद्या भागात सामाजिक अंतर पाळले जात नाही, तर तो भाग आम्हाला सील करावा लागेल व आहे ती सवलतही परत घ्यावी लागेल.’ दिल्ली उत्पादन शुल्क विभागाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार दिल्लीत सकाळी 9 ते सायंकाळी 6.30 या दरम्यान दारूची दुकाने उघडली जातील. सोमवारी, दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने दारूच्या दुकानात सामाजिक अंतर पाळणे जात नसल्याबद्दल एक अहवाल तयार केला. यात दारू विक्रीची वेळ वाढविण्यात यावी अशी सूचना पोलिसांकडून देण्यात आली आहे. त्यात आता 70 टक्के ज्यादा कराचा नियम लागू झाल्यावर दारूच्या दुकानाबाहेरील गर्दी काही प्रमाणत कमी होईल अशी अशा व्यक्त केली जात आहे.