भारत सध्या कोरोना विषाणूच्या (Coronavirus) धोकादायक अशा दुसऱ्या लाटेचा सामना करीत आहे. जगातील कोरोना आपत्तीचे केंद्रबिंदू म्हणून देशाकडे पहिले जात आहे. देशातील रुग्णालयांमध्ये बेड, ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात कमतरता आहे. या सर्वांच्या दरम्यान, तज्ञांनी असा इशारा दिला आहे की भारतात ज्या प्रकारे संसर्ग वाढत आहे, त्यानुसार पुढील काही आठवड्यांत देशाला अतिरिक्त 5 लाख आयसीयू बेडची आवश्यकता भासणार आहे. प्रख्यात सर्जन डॉ. देवी प्रसाद शेट्टी (Dr Devi Prasad Shetty) यांनी याबाबत सांगितले आहे. तसेच आयसीयू बेड व्यतिरिक्त भारताला 2 लाख नर्सेस आणि 1.5 लाख डॉक्टरांची आवश्यकता असणार आहे.
शेट्टी यांनी भारतातील कोविड-19 आजार आणखी वाढणार असून परिस्थिती गंभीर होणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. यासह या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी काही सूचनाही केल्या आहेत. पीटीआयच्या वृत्तानुसार, डॉ. शेट्टी म्हणाले की, सध्या भारतात 75 ते 90 हजार आयसीयू बेड आहेत आणि ते ही महामारी दुसऱ्या लाटेच्या पीकवर पोहोचण्यापूर्वीच भरले गेले आहेत. डॉ. शेट्टी हे भारतात 21 वैद्यकीय केंद्रे चालविणाऱ्या नारायण हेल्थ सोसायटीचे अध्यक्ष आहेत.
वृत्तानुसार, ते म्हणाले की, दररोज जवळजवळ साडेतीन लाख नवीन प्रकरणे भारतात येत आहेत आणि काही तज्ञ म्हणतात की, जेव्हा ही महामारी शिगेला पोहोचेल तेव्हा ही संख्या दररोज पाच लाख असू शकते. त्यांनी अधोरेखित केले की, प्रत्येक संक्रमित रूग्णाच्या जवळपासच्या पाच ते दहा लोकांची टेस्टिंग केली जात नाही, याचा अर्थ असा आहे की, भारतात दररोज 15 ते 20 लाख लोक संक्रमित होत आहेत. यातून परिस्थितीचा अंदाज आपण लावू शकता व त्यामुळे नवीन आयसीयू बेडची व्यवस्था करणे फार महत्वाचे आहे. (हेही वाचा: कोरोनाच्या लसीकरणासाठी CoWin App वर पहिल्याच दिवशी तब्बल 1 कोटींहून अधिक नागरिकांचे रजिस्ट्रेशन)
यासह स्टाफदेखील वाढवण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले, जेणेकरून ते पुढील एक वर्षापर्यंत कोविड-19 रूग्णांवर उपचार करू शकतील. सध्याची महामारी सुमारे चार ते पाच महिने टिकेल आणि त्यानंतर आपल्याला तिसऱ्या लाटेसाठी तयार असले पाहिजे. यासाठी त्यांनी सुचविले की, भारतात जवळजवळ सव्वा दोन लाख नर्सिंग विद्यार्थी आहेत जे आपल्या शेवटच्या वर्षात किंवा तिसर्या वर्षी आहेत. सध्याच्या परिस्थितीत त्यांचा उपयोग करून घेता येईल. त्याचवेळी वैद्यकीचा अभ्यास करणारे लाखो विद्यार्थीदेखील या लढाईमध्ये मदत करू शकतील.