Coronavirus संसर्गामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबाला मिळणार 50 हजार, मुलांनाही मिळणार पेन्शन; अरविंद केजरीवाल यांची घोषणा
Arvind Kejriwal | (Photo Credits-Facebook)

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ( CM Arvind Kejriwal) यांनी आज (मंगळवार, 18 मे 2021) चार महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत. दिल्ली राज्यात कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्गामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना 50 हजार रुपये, तसेच मृतांच्या मुलांना 25 वर्षे वयापर्यंत प्रतिमहिना 2500 रुपये पेन्शन, लॉकडाऊनचा (Lockdown) फटका बसलेल्या गरीबांना निशुल्क 10 किलोग्रॅम राशन, अनाथ बालकांना पेन्शन आणि त्यांच्या शिक्षणाचा खर्च सरकार उचलणा, अशा घोषणांचा यामध्ये समावेश आहे. दिल्ली (Delhi) राज्यात 22,111 व्यक्तिंचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले की, कोरोना ही एक मोठीच समस्या ठरली आहे. अनेक कुटुंबं अशी आहेत ज्यातील कमावता सदस्याचाच कोरोनामुळे मृत्यू झाला. अशा कुटुंबातील व्यक्तिंना दिल्ली सरकारने प्रतिमहिना 2500 रुपये पेन्शन देण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेला व्यक्ती जर पुरुष असेल तर पत्नीला ही पेन्शन मिळू शकेन. कोरोनामुळे मृत्यू झालेली व्यक्ती जर महिला असेल तर तिच्या पतीला ही पेन्शन दिली जाईल. जर कोरोनामुळे मृत्यू झालेला व्यक्ती जर अविवाहीत असेल तर त्याच्या आई-वडीलांना ही पेन्शन दिली जाईल. (हेही वाचा,  Shahid Jameel या विषाणूतज्ञाने केंद्र सरकारच्या COVID-19 Genome Surveillance Project ला ठोकला रामराम; देशातील कोरोनास्थिती हाताळण्यावरून केली होती टीका)

मुख्यमंत्री केजरीवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांना प्रतिमहिना 2500 रुपये पेन्शन दिली जाईल. जर एखाद्या कुटुंबातील आई-वडीलांपैकी एकाचा मृत्यू आगोदर झाला आहे आणि दुसऱ्याचा मृत्यू कोरोनामळे झाला आहे तर अशा वेळीही मृतांच्या मुलांना 25 वर्षांपर्यंत पेन्शन दिली जाईल. तसेच, दिल्ली सरकार या मुलांचा शिक्षणाचा खर्च स्वत: उचलणार आहे. याशिवाय दिल्ली सरकारने लॉकडाऊनमुळे प्रभावित झालेल्या लोकांना मोफत राशन देण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले की, दिल्ली सरकारद्वारा दिल्लीतील 72 लाख रेशन कार्ड धारकांना 10 किलो निशुल्क राशन दिले जाईल. यात 5 किलो राशन दिल्ली सरकारद्वारा आणि 5 किलो राशन पंतप्रधान मोफत राशन योजनेद्वारे मिळेण.