Covishield: कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर परस्परच दुप्पट? भारतीय वैज्ञानिकांच्या गंभीर दाव्यामुळे प्रश्नचिन्ह
Vaccination | Representative Image (Photo Credits: Pixabay)

कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने कोविशिल्ड (Covishield) लसीच्या दोन डोसमधलं अंतर वाढण्याबाबतचा निर्णय जाहीर केला. केंद्राने 13 मे रोजी जाहीर केलेल्या निर्णयानुसार लसीच्या दोन डोसमधील अंतर12 ते 16 आठवडे इतकं निश्चित करण्यात आले. आगोदर हे अंतर 6 ते 8 आठवडे होते. लसींमधील अंतर वाढविण्याबाबतचा निर्णय वैज्ञानिकांच्या गटाने केलेल्या शिफारशीनुसारच घेण्यात आल्याचे तेव्हा सांगण्यात आले होते. आता मात्र वृत्त पुढे आले आहे की, कोविशिल्डच्या दोन लसींमधील अंतर वाढवून जवळपास दुप्पट करण्यास वैज्ञानिकांचा पाठीबाच नव्हता. तज्ज्ञ गटातील 3 सदस्यांनी हा खुलासा केल्याचे समजते. रॉयटर्स या वृत्तसंस्थेच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी हे वृत्त दिले आहे.

दरम्यान, तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, जर लसीच्या डोसमधील अंतर वाढविण्याचा निर्णय घ्यायला वैज्ञानिकांचा पाठिंबा नव्हता. तर मग केंद्र सरकारने कशाच्या जोरावर इतका मोठा निर्णय घेतला असे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. देशात कोरोना लसीचा मोठ्या प्रमाणात तुटवडा होता. आजही आहे. असे असताना केंद्राने कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर 12 ते 16 आठवडे करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय नॅशनल टेक्निकल अॅडवायजरी ग्रुप ऑन इम्युनायझेशन (NTAGI) या गटाने दिलेल्या सल्ल्यानुसारच घेण्यात आल्याचेही तेव्हा जाहीर करण्यात आले. परंतू, याच गटातील काही तज्ज्ञांनी आता खुलासा केला आहे. अशा कोणत्याही निर्णयाला समर्थन देण्यात आले नव्हते. (हेही वाचा, दिल्लीत Sputnik V पुढील आठवड्यापासून मिळण्याची शक्यता)

रायटर्स या वृत्तसंस्थेच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी वृत्त दिले आहे. या वृत्तात नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ एपिडेमोलॉजीचे माजी संचालक एम. डी. गुप्ते यांची प्रतिक्रिया देण्यात आली आहे. गुप्ते यांनी म्हटले आहे की, NTAGI गटाच्या वैज्ञानिकांनी कोविशिल्ड डोसचे अंतर 8 ते 12 आठवड्यांनी वाढविण्यासाठी सहमती दर्शवण्यात आली होती. जागतिक आरोग्य संघटनेनेही हा सल्ला दिला होता. परतू हे प्रत्यक्षात हे आंतर 12 ते 16 आठवड्यांनी वाढविण्यात आले. हे आकडे NTAGI चे नव्हेत तर केंद्र सरकारचे आहेत. लसीच्या दोन डोसमधील अंतर हे जर 12 आठवड्यांपेक्षा अधिक झाले तर त्याचे काय परिणाम होऊ शकतात याचा कोणताही डेटा NTAGI नसल्याचे गुप्ते यांनी म्हटले आहे. दरम्यान, NTAGI गटातील आणखी एक सदस्य मॅथ्यु वर्गेसी यांनी देखील गुप्तेंच्या दाव्याला दुजोरा देत वैज्ञानिकांनी हे अंतर केवळ 8 ते 12 आठवड्यांनीच वाढवावे असा सल्ला केंद्राला देण्यात आला होता असे म्हटले.

NTAGI गटातील आणखी एक सदस्य जे. पी. मुलीयिल यांनीही गुप्तेा यांच्या वक्तव्यास दुजोरा देत म्हटले की, लसीच्या दोन डोसमधील अंतर 12 ते 16 आठवड्यांपर्यंत वाढविण्याबाबत कोणताही सल्ला देण्यात आला नव्हता. दरम्यान, दोन डोसमधील अंतर वाढविण्याबाबतचा निर्णय हा लसीच्या तुटवड्यानुसार नव्हे तर तज्ज्ञांच्या शिफारशीवरुनच घेण्यात आल्याचे केंद्र सरकारने त्या वेळी सांगितले होते.