Subramanian Swamy On Pmo: पंतप्रधान कार्यालय अकार्यक्षम, कोरोना महामारी हाताळण्याचे नेतृत्व नितीन गडकरी यांच्याकडे द्या; भाजप खासदाराची मागणी
कोरोना परिस्थिती हाताळण्यात पंतप्रधान कार्यालय अयशस्वी ठरले आहे. कोरोना महामारी संकट आणि परिस्थिती हाताळण्याची जबाबदारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सोपविण्यात यावी. स्वामी यांच्या ट्विटनंतर देशात नव्या चर्चेला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
भारतात कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्गाची पहिली लाट संपून आता दुसरी लाट आली आहे. दुसऱ्या लाटेने पहिल्या लाटेपेक्षा अतिशय भयान रुप धारण केले आहे. त्यामुळे कोरोना काळात केंद्र सरकारने काय काय उपाययोजना केल्या याची मिमांसा होऊ लागली आहे. सर्वोच्च न्यायालयानेही केद्र सरकारवर ताशेरे ओढले आहेत. दरम्यान, आता भाजप खासदारही केंद्र सरकारला घरचा आहेर देऊ लागले आहेत. भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी (Subramanian Swamy) यांनी तर ट्विट करुन थेट पंतप्रधान कार्यालयावरच (PMO) हल्ला चढवला आहे. कोरोना परिस्थिती हाताळण्यात पंतप्रधान कार्यालय अयशस्वी ठरले आहे. कोरोना महामारी संकट आणि परिस्थिती हाताळण्याची जबाबदारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्याकडे सोपविण्यात यावी. स्वामी यांच्या ट्विटनंतर देशात नव्या चर्चेला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विटमध्ये काय म्हटले?
भारत कोरोना व्हायरस संकटातून मार्ग काढतो आहे. भारताने जसा ब्रिटीश आणि इस्लामिक आक्रमकांपासून आपला बचाव केला त्यातून बाहेर पडला त्याच पद्धतीने आताही तो बाहेर पडेल. या संकटाचा सामना करुन आपण टीकू. आपण कोरोना काळात योग्य निर्बंध लावयला हवेत. अन्यथा थेट मुलांवर परिणाम करणारी दुसरी लाट येऊ शकेल. आता आपल्याला पंतप्रधान कार्यालयावर अवलंबून राहून चालणार नाही. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संकट निवारणाची जबाबदारी आता नितीन गडकरी यांच्याकडे सोपवावी. (हेही वाचा, Subramanian Swamy म्हणतात 'भारत विश्वगुरु होण्याच्या दाव्याची निघाली हवा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्याचा सामना करण्याची ही वेळ')
सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, कोरोना व्हायरस संकटासोबत लढण्याची आणि परिस्थिती हाताळण्याची सर्व जबाबदारी ही केंद्र सरकारने नितीन गडकरी यांच्यावर सोपविण्यात यावी. केवळ पंतप्रधान कार्यालयावर निर्भर राहून चालणार नाही. सुब्रमण्यम स्वामी यांनी दोन दिवसांपूर्वीच केंद्र सरकारवर हल्ला चढवत म्हटले होते की, आता सरकारने हे सांगणे बंद करावे की आपल्याकडे किती ऑक्सिजन आहे. सरकारने हे सांगावे की किती ऑक्सिजन आम्ही रुग्णालयांपर्यंत पोहोचवू शकलो.
भारतातील कोरोना रुग्णांची संख्या तासागणीक वाढते आहे. गेल्या 24 तासात भारतात 3,82,315 जणांना कोरोना व्हायरस संसर्ग झाला. संक्रमितांच्या नव्या आकडेवारीमुळे देशातील एकूण कोरोना संक्रमितांची संख्या 2,06,65,148 इतकी झाली आहे. गेल्या 24 तासात भारतात 3,38,439 जणांना डिस्चार्ज मिळाला. देशात आतापर्यंत एकूण 1,69,51,731 रुग्ण कोरोनातून बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज मिळाला. तर आतापर्यंत 2,26,188 नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 16,04,94,188 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.