Condom Scam: कंडोम घोटाळा उघडकीस, 11 कंपन्यांना सरकार ठोठावणार दंड
Photo Credits: Pixabay

घोटाळा होणं हे देशातील जनतेला मुळीच नवं नाही. विविध सरकारच्या काळात विविध घोटाळे बाहेर आलेत. पण, देशात सध्या एक भलताच घोटाळा पुढे येत आहे. ज्यामुळे सर्वसामान्यांसोबतच अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. होय, देशात चक्क कंडोम घोटाळा (Condom Scam)  घडल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. कंडोम उत्पादक 11 कंपन्यांवर हा आरोप करण्यात येत आहे. आरोप आहे की, या कंपन्यांनी  2010 ते 2014 या कालावधीत कंडोम (Condom ) घोटाळा करुन सरकारला चुना लावला आहे. कंडोम उत्पादन करत असलेल्या या कंपन्यांची संख्या एकूण 11 इतकी असल्याचे प्राथमिक वृत्त आहे.

2010 ते 2014 या काळात सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने (Health Ministry)  वेगवेगळ्या संघटनांना मोफत किंवा अनुदानाच्या दरात वितरीत करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कंडोमची खरेदी केली होती.

कॉम्पटीशन कमिशन ऑफ इंडिया (सीआईआई) ने केलेल्या चौकशीत या सर्व कंपन्यांची फसवेगिरी पुढे आली असून, या कंपन्यांनी सरकारकडून अधिक पैसे उकळल्याचाही आरोप करण्यात येतो आहे. एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, या कंपन्यांनी आपापसात मिळून परस्पर संमतीने (मिलीभगत) प्रतियोगी  बोली लावली होती. (हेही वाचा, पुणे: कंडोम वापरता? आता पिशवीही वापरा! विद्यार्थ्यांच्या लढ्याला मोठे यश)

सीआयआयच्या अधिकाऱ्याने म्हटले आहे की, ही जाणीवपूर्वक केलेला अव्यवहार आहे. या कंपन्यांनी आपसात मिळून जणीवपूर्वक अधिक दरांची बोली लावली. अनेक बोली या कमीत कमी पातळीपासून 50 पैशांच्याही आत होत्या. या अधिकाऱ्याने म्हटले आहे की, अशा स्थितीत सरकार सर्वात कमी बोली लावणाऱ्या उत्पादक कंपनीलाच उत्पादनाचा (कंडोम) पुरवठा करण्यास सांगते. ज्यामुळे त्या कंपनीला टेंडर ऑर्डर मिळते.

विशेष म्हणजे ज्या कंपन्यांवर घोटाळ्याचा आरोप करण्यात आला आहे त्यात दोन सरकारी कंपन्यांचा समावेशही असल्याचे समजते. अद्याप चौकशी होणे बाकी आहे. मात्र, या कंपन्या जर या प्रकरणात दोषी आढळल्या तर,  या कंपन्यांना आपल्या वार्षीक उत्पन्नाच्या तिप्पट किंवा सरासरी उत्पन्नाच्या (टर्नओवर) 10 टक्के रक्कम दंड रुपात सरकारला द्यावी लागेल.