Chennai: धक्कादायक! नवऱ्याला 'अमरत्व' प्राप्त व्हावे म्हणून पत्नीने त्याला जिवंत पुरले; गुन्हा दाखल, तपास सुरु
प्रातिनिधिक प्रतिमा (File Image)

अजूनही देशातील मोठ्या प्रमाणावरील जनता अंधश्रद्धेच्या (Superstitions) गर्तेत बुडाली आहे. अंधश्रद्धेच्या अक्षरशः आहारी जाऊन किती विचित्र आणि चुकीचे निर्णय घेतले जातात हे आपण यापूर्वी अनेकवेळा ऐकले असेल. आताचे ताजे प्रकरण चेन्नईच्या (Chennai) पेरुम्बक्कम (Perumbakam) जिल्ह्यातील आहे. येथे एका महिलेने आपल्या पतीला जिवंत गाडले आहे. पती अमर (Immortality) व्हावा म्हणून महिलेने पतीला जिवंत पुरले. या जोडप्याची मुलगी आयटी फर्ममध्ये जॉब करते. घरी परतल्यानंतर जेव्हा तिने वडिलांचा शोध घेण्यास सुरुवात केली, तेव्हा ही धक्कादायक घटना उघडकीस आली.

घरात कुठेच वडील न सापडल्याने ती त्यांचा शोध घेत घराच्या मागील बाजूस पोहोचली. त्यावेळी तिथे तिला माती खणलेली दिसली. त्यानंतर मुलीने वडील गायब असल्याबाबत पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह जमिनीतून बाहेर काढला आणि तपास सुरू केला. द न्यू इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, पेरुम्बक्कममधील कलैग्नार करुणानिधी नगरचा रहिवासी नागराजा हा एक स्वघोषित ज्योतिष होता. त्याने असा दावा केला होता की त्याने काही मंदिरांना भेटी देऊन देवी-देवतांशी संवाद साधला आहे.

नागराजने त्यांच्या घराच्या मागील अंगणात एक मंदिर देखील बांधले होते आणि लोकांचे भविष्य सांगण्यासाठी तो तिथे बसत असे. एका पोलीस अधिकाऱ्याने त्याच्या मुलीचा हवाला देत सांगितले की, 16 नोव्हेंबर (मंगळवार) नागराजच्या छातीत दुखू लागले आणि त्याने पत्नी लक्ष्मीला सांगितले की तो आता मरणार आहे. आपल्याकडे अगदी थोडे आयुष्य शिल्लक आहे असे त्याला वाटले त्यामुळे त्याने पत्नीला आपल्याला जिवंत पुरण्यास सांगितले. याद्वारे देवांनी दिलेल्या वचनानुसार आपण अमरत्व प्राप्त करू शकू, असा विश्वास त्याला होता.

त्यानंतर लक्ष्मीने दोन मजुरांना तिच्या घरामागे एक मोठा खड्डा खोदण्यासाठी बोलावले. पाण्याच्या टाकीसाठी हा खड्डा असल्याचे तिने सांगितले. 17 नोव्हेंबर रोजी लक्ष्मीने नागराजला बेशुद्ध अवस्थेत खड्ड्यात पुरले. शुक्रवारी, आयटी फर्ममध्ये काम करणारी त्यांची मुलगी घरी परतली आणि आपले वडील बेपत्ता असल्याचे पाहून तिला धक्का बसला. लक्ष्मीने रात्री उशिरापर्यंत मुलीला याबाबत काही माहिती देण्याचे टाळले. परंतु शेवटी तिने सत्य काय ते सांगितले. (हेही वाचा: Madhya Pradesh: दोन्ही डोस घेतलेल्या महिलेचा कोरोनामुळे मृत्यू, एकाच आठवड्यातील दुसरी घटना)

पोलिसांनी याबाबत गुन्हा नोंदवला असून नागराजचा मृतदेह बाहेर काढून तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. नागराजला जिवंत गाडले होते की नाही हे पोस्टमॉर्टमच्या निकालात स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले.