Bomb Blast Threat: दिवाळीत घातपाताची शक्यता? लखनौ, वाराणसीसह UP मधील 46 रेल्वे स्थानके बॉम्बने उडवण्याची धमकी; गुप्तचर विभागाने जारी केला अलर्ट
Railway Station (Representational Image/ Photo Credit: PTI)

दिवाळीपूर्वी (Diwali 2021) उत्तर प्रदेशला (Uttar Pradesh) हादरवून टाकण्याची योजना असल्याचा इशारा गुप्तचर विभागाकडून मिळाला आहे. यामुळे राज्यासह देशात खळबळ उडाली आहे. लखनौ, अयोध्या, कानपूर, वाराणसीसह 46 रेल्वे स्थानके बॉम्बने (Bomb Blast) उडवण्यात येणार असल्याची धमकी मिळाली आहे. दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाच्या (Lashkar-e-Taiba) नावाने हे धमकीचे पत्र मिळाले आहे. या दहशतवादी हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतर रेल्वे विभागात खळबळ उडाली आहे. यूपीच्या सर्व रेल्वे स्थानकांवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. तत्पूर्वी, स्वातंत्र्यदिनीही दहशतवादी हल्ल्याचा इशारा मिळाला होता.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, इंटेलिजन्स अलर्टनंतर जीआरपी, आरपीएफ आणि डॉग स्क्वाडने अनेक रेल्वे स्थानकांवरील सुरक्षा तपासली. याशिवाय सखोल शोधमोहीम राबवली जात आहे. मात्र, अशी धमकी पहिल्यांदाच मिळाली नसल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. यापूर्वीही स्थानके उडवण्याच्या धमक्या आल्या आहेत. यावेळीही या धमकीची गांभीर्याने दखल घेतली जात असून, सतर्कता वाढवण्यात आली आहे.

रेल्वे प्रोटेक्शन फोर्स आणि जीआरपीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, लष्कर-ए-तैयबाच्या एरिया कमांडरच्या नावाने हे पत्र पाठवण्यात आले असून त्यात स्थानके उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यांनी सांगितले की, यापूर्वी 2018 मध्येही या दहशतवादी संघटनेने अशी धमकी दिली होती. धमकी मिळाल्यानंतर आता स्थानकातून जाणाऱ्या गाड्या तसेच येथून सुटणाऱ्या गाड्यांमध्ये शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. (हेही वाचा: Naxalites Killed In Chhattisgarh: दंतेवाडा जिल्ह्यात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांत चकमक, तीन महिला नक्षलवादी ठार)

गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या अलर्टनुसार, वाराणसी, गोरखपूर, अलीगढ, लखनौ, बरेली, मुरादाबाद, प्रयागराज, कानपूर, अयोध्या तसेच उत्तराखंडचे हरिद्वार रेल्वे स्थानक दहशतवाद्यांचे लक्ष्य आहे. धमकीचे पत्र मिळाल्यानंतर आरपीएफ आणि जीआरपीला कोणी संशयास्पद वाटल्यास त्याचा शोध घ्यावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. दिवाळीच्या मुहूर्तावर सध्या ट्रेनमध्ये खूप गर्दी असते, त्यामुळे विशेष खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे रेल्वेने सांगितले आहे.