Jayant Ballawar Murder Case: बाप पोलीस, मुलगीही पोलीस; पण प्रेमासाठी खाकीलाच काळिमा, ३ वर्षांनंतर उघड झाले हत्येचे गुपित
2023 मधील पोलीस अधिकारी जयंत बल्लावार यांच्या मृत्यूचे गूढ उकलले असून, त्यांच्या मुलीनेच प्रियकराच्या मदतीने त्यांची हत्या केल्याचे तपासात समोर आले आहे.
चंद्रपूर: एप्रिल 2023 मध्ये कर्तव्यावर असताना अचानक प्रकृती बिघडून मृत्यू झालेले पोलीस अधिकारी जयंत बल्लावार (Jayant Ballawar Murder Case) यांची हत्या झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सुरुवातीला हा नैसर्गिक मृत्यू वाटत असला तरी, तीन वर्षांनंतर त्यांच्याच मुलीने आणि तिच्या साथीदारांनी हे षडयंत्र रचल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी मृताची मुलगी आर्या बल्लावार (Arya Ballawar Arrested) आणि तिच्या पतीसह चौघांना अटक केली आहे.
घटनेची पार्श्वभूमी आणि बनावट मृत्यू
२५ एप्रिल २0२३ च्या सकाळी जयंत बल्लावार नेहमीप्रमाणे ड्युटीवर जाण्यासाठी तयार झाले होते. त्यांची मुलगी आर्या, जी स्वतः पोलीस दलात कार्यरत आहे, तिने वडिलांना पिण्यासाठी मिल्कशेक दिला. तो पिल्यानंतर बल्लावार चंद्रपूर जिल्हा दंडाधिकारी कार्यालयाकडे निघाले. मात्र, तेथे पोहोचताच त्यांना चक्कर आली आणि ते कोसळले. रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. त्यावेळी कोणताही संशय न आल्याने आणि वैद्यकीय प्राथमिक अंदाजानुसार हा मृत्यू नैसर्गिक मानून फाईल बंद करण्यात आली होती.
प्रेमसंबंधातून हत्येचा कट
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आर्या बल्लावार हिचे आशिष शेडमाके याच्याशी २0२२ पासून प्रेमसंबंध होते. जयंत बल्लावार यांचा या नात्याला तीव्र विरोध होता. हा अडथळा दूर करण्यासाठी आर्या आणि आशिषने त्यांच्या हत्येचा कट रचला. यासाठी आर्याने तिचा चुलत भाऊ चैतन्य गेडाम (२२) याला ५,000 रुपये देऊन विष आणायला सांगितले. एका चौथ्या व्यक्तीने, ज्याची ओळख अद्याप गुप्त ठेवली आहे, त्याने हे विष पुरवले होते. घटनेच्या दिवशी आर्याने हेच विष मिल्कशेकमध्ये मिसळून वडिलांना दिले होते.
वैवाहिक वादामुळे फुटले गुपित
जयंत बल्लावार यांच्या मृत्यूनंतर आर्या आणि आशिषने लग्न केले. मात्र, त्यांचे वैवाहिक जीवन फार काळ सुखाचे राहिले नाही. आशिषची शिस्तभंग आणि गैरवर्तनामुळे पोलीस प्रशिक्षणातून हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर आर्याने सासरी राहण्याऐवजी माहेरीच राहणे पसंत केले. यावरून दोघांमध्ये सतत वाद होत असत. याच वादातून आणि पश्चात्तापातून गेल्या आठवड्यात आशिषने पोलीस ठाण्यात जाऊन या हत्येची कबुली दिली.
पोलिसांकडून पुढील तपास सुरू
आशिषच्या कबुलीनंतर पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत आर्या, चैतन्य आणि अन्य एकाला ताब्यात घेतले आहे. ज्या मृत्यूला तीन वर्षांपूर्वी नैसर्गिक समजून विसरले गेले होते, त्या प्रकरणाचा आता खून म्हणून फेरतपास केला जात आहे. या घटनेने पोलीस दलात आणि चंद्रपूर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.