Air India च्या 5 वैमानिकांना कोरोना व्हायरसची लागण
Air India | Representational Image | (Photo Credits: Wikimedia Commons)

देशात कोरोना व्हायरसचा (Coronavirus) संसर्ग वाढत असताना आता एअर इंडियाच्या (Air India) 5 वैमानिकांना कोविड 19 ची बाधा झाल्याचे समोर आले आहे. विमान उड्डाण घेण्याच्या 72 तास अगोदर वैमानिकांची तपासणी करण्यात आली. त्यात 5 जणांची चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. हे सर्व पायलट मूळचे मुंबईचेअसून चीनला जाणाऱ्या कार्गो फ्लाईट्सचे ते वैमानिक आहेत. अशी माहिती एअर इंडियाच्या सुत्रांनी दिली आहे. या कार्गो फ्लाईट्स औषधांची ने-आण करत असून चीनमधील गुआंगझोउ (Guangzhou) येथून दिल्ली पर्यंत प्रवास करतात.

विमान उड्डाणापूर्वी 5 दिवस वैमानिकांची कोविड 19 ची चाचणी करण्यात येते. त्याचप्रमाणे या वैमानिकांची देखील चाचणी करण्यात आली आणि त्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. दरम्यान लॉकडाऊनमुळे इतर देशांत अडकलेल्या भारतीयांना आणण्यासाठी वन्दे भारत मोहिम सुरु करण्यात आली आहे. त्यासाठी विविध देशांत एअर इंडियाच्या विशेष उड्डाणांना सुरुवात झाली असून पहिला टप्पा 9-15 मे या काळात पार पडणार आहे.

ANI Tweet:

भारतात कोरोनाची व्याप्ती वाढत आहे. मागील 24 तासांत 3277 रुग्णांची भर पडली असून 127 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे भारतातील कोरोना बाधितांचा आकडा 62939 वर पोहचला आहे. त्यापैकी 19358 रुग्ण कोरोनातून मुक्त झाले असून 41472 रुग्णांवर अद्याप उपचार सुरु आहेत. तर 2109 रुग्णांचा कोरोना संसर्गामुळे बळी गेला आहे. दरम्यान कोरोना व्हायरसची वाढती साखळी तोडण्यासाठी देश गेल्या दीड महिन्यापासून लॉकडाऊनच्या स्थितीत आहे. लॉकडाऊनचे नियम पाळण्याबरोबरच स्वत:ची काळजी घेणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.