अभिनेता कमल हासन यांना अखेर अटकपूर्व जामीन मंजूर, मद्रास हायकोर्टाचा निर्णय
File image of MNM Chief Kamal Haasan | (Photo Credits: ANI)

अभिनेता कमल हासन(Kamal Haasan)  यांनी नथुराम गोडसे (Nathuram Godse) यांच्यावर केलेल्या वादग्रस्त विधानामुळे देशभरातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत होत्या. त्याचेच पडसाद म्हणून त्यांना अटक केली जाईल, असा सूरही ऐकायला येत होता. मात्र मद्रास हायकोर्टाने (Madras High Court) त्यांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला. चेन्नईतील अर्वाकुरची इथल्या प्रचारावेळी कमल हसन यांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर भाषण करताना नथुराम गोडसे हिंदू दहशतवादी असल्याचे विधान केले होते.

या विधानाचा भाजप-शिवसेनेकडून कडाडून निषेध केला गेला. तर या विधानामुळे कमल हासन यांच्यावर मदुराईत मद्रास हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली. अखेर आज मद्रास हायकोर्टाने त्यांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. तसेच आपण केलेले "ते भाषण केवळ नथुराम गोडसे यांच्याविरुद्ध होते, सर्व हिंदूंच्या विरोधात नव्हते," असे स्पष्टीकरण कमल हासन यांच्याकडून देण्यात आले होते.

नथुराम गोडसे यांच्यावरील वादग्रस्त विधानानंतर कमल हासन म्हणाले- "मी अटकेला घाबरत नाही

तसेच सर्वत्र त्यांच्या अटकेच्या वावड्या उठत असतानाच "मला कोणाला अटक करायची असेल तर करु द्या. अटकेला मी घाबरत नाही. जर त्यांनी असे केले तर समस्या अधिक वाढतील. ही ताकीद नाही तर हा सल्ला आहे." असेही ते काही दिवसांपूर्वी म्हणाले होते.