'स्टेट बँक ऑफ मॉरिशस’च्या मुंबई शाखेचे सर्व्हर हॅक; तब्बल 143 कोटी लुटले
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

प्रसिद्ध आणि प्रतिष्ठित लोकांची सोशल मिडिया अकाऊंट्स हॅक होणे, विविध संस्था आणि कार्यालयांची संकेतस्थळे हॅक होणे हे प्रकार घडत असल्याचे आपण पाहतो. त्याचा जनसामान्यांवर थेट काही परिणाम होत नाही. मात्र जर का कोणी एका बँकेचे सर्व्हर हॅक करून तुमच्या खात्यामधील पैशांची अफरातफर अथवा चोरी केली तर? होय असाच प्रकार घडला आहे ‘स्टेट बँक ऑफ मॉरिशस’च्या मुंबई शाखेत. या बँकेच्या सर्व्हरवर हल्ला करून चोरट्यांनी तब्बल 143 कोटींवर डल्ला मारला आहे.

स्टेट बँक ऑफ मॉरिशस’ची मुंबईच्या नरिमन पॉईंट येथे रहेजा सेंटर मधील 15व्या मजल्यावर शाखा आहे. या शाखेत 1 ऑक्टोबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान सायबर चोरीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. चोरट्यांनी बँकेचे सर्व्हर हॅक करून विविध खात्यांमधील पैसे परदेशातील खात्यांमध्ये ट्रान्सफर केले. ही चोरी कोणी केली, हे हॅकिंग कसे झाले याबाबत काही ठोस माहिती मिळू शकली नाही. 5 ऑक्टोबरला बँकेने पोलिसांकडे याबाबत तक्रार केली, आणि आता पोलीस या घटनेचा कसून शोध घेत आहेत. दरम्यान या कटात बँकेमधीलच कोणी सामील आहे का याचाही पोलीस तपास करत  आहेत. (हेही वाचा अनेकांचे दुकान बंद, काहींचे काम सुरु: तब्बल ४८ तासांसाठी संपूर्ण जगाचे Internet Shutdown होणार)

तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळे सध्या गोष्टी हॅक करणे हा खूपच कॉमन प्रकार झाला आहे. मात्र बँकिंग क्षेत्रात जेव्हा असे प्रकार घडतात तेव्हा ते फार नुकसानकारक असतात आणि त्यांचे परिणामही फार गंभीर होतात. गेल्या 9 महिन्यांमधील ही तिसरी अशी घटना आहे. या फेब्रुवारीमध्ये सिटी युनियन बँकेच्या चेन्नई शाखेमध्ये सायबर हल्ल्यामुळे 34 करोड रुपयांची चोरी झाली होती, तर ऑगस्टमध्ये कॉसमॉस बँकच्या पुणे येथील मुख्यालयामधून 94 करोड लुटले होते. या घटना पाहता सध्या देशातील अनेक बँकांना हॅकर्सनी लक्ष्य केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जनतेच्या पैश्यांची सुरक्षितता वाढवण्यासाठी बँकांनी काही ठोस पावले उचलणे गरजेचे आहे.