मोदीप्रेम पवारांना भोवले 'राष्ट्रवादी'ला धक्का; केंद्रीय नेत्याची पक्षाला सोडचिठ्ठी
तारिक अन्वर (Photo Credit: PTI )

राफेल करारामुळे सध्या देशातील वातावरण बरेच तापले आहे. एकीकडे कॉंग्रेसकडून होणारे वार तर दुसरीकडे जनतेकडून उद्भवलेले प्रश्न यांना तोंड देता देता मोदी सरकारच्या नाकीनऊ आले आहे. त्यामुळेच राजकीय वर्तुळातली अनेक नेते मंडळी मोदी सरकारला पाठींबा देण्यासाठी पुढे सरसावली आहेत. यातीलच एक नाव म्हणजे शरद पवार. शरद पवारांनी राफेल करारावरून पंतप्रधान मोदींना क्लीन चिट दिली होती. तसेच मोदींच्या हेतूवर जनतेला संशय नसल्याचं ते म्हणाले होते. मात्र याची शरद पवारांना फार मोठी किंमत मोजावी लागली आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे समर्थन केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस आणि बिहारच्या कटिहार मतदारसंघाचे खासदार तारिक अन्वर यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. तसंच अन्वर यांनी लोकसभा खासदारकीचाही राजीनामा दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून तारिक अन्वर हे शरद पवार यांच्यासोबत होते. ते शरद पवारांचे अतिशय निकटवर्तीय मानले जातात. तसेच तारिक अन्वर हे राष्ट्रवादी पक्षाचे संस्थापक सदस्य होते. त्यामुळे आता यांच्या राजीनाम्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये शरद पवार यांनी, 'राफेल करारामध्ये पंतप्रधान मोदी यांच्या हेतूंबद्दल काहीही शंका नाही', असे विधान केले होते. पवारांच्या याच विधानावर नाराज होत तारिक अन्वर यांनी राजीनामा दिल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात आहे.

तारिक अन्वर आता कॉंग्रेसमध्ये जाणार अशा चर्चेलाही आता उधाण आले आहे. लोकसभा निवडणूक तोंडावर आली असताना कॉंग्रेस बिहारमध्ये आपले पाय रोवण्याचा संपूर्णतः प्रयत्न करत आहे. या पाश्वर्भूमीवर तारिक यांनी दिलेला राजीनामा कॉंग्रेससाठी फायद्याचा ठरू शकतो.