राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये महानगरपालिका निवडणुकीसाठी आज मतदान
जम्मू-काश्मीरमध्ये मतदान करताना नागरिक (Photo credit: ANI)

जम्मू-काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर महानगरपालिका निवडणुसाठी आज (सोमवार, ८ ऑक्टोबर) मतदान पार पडत आहे. जम्मू-काश्मीरमधील एकूण स्थिती पाहता मतदान सुरळीत पार पडावे यासाठी कडेकोठ बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. महानगरपालिकेसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी मतदानाचा हा पहिला टप्पा आहे. महापालिका निवडणुकीआधी विविध दहशतवादी संघटनांकडून दहशतवादी घटना घडविण्याबद्दल धमक्या आल्या होत्या. त्यामुळे तपास यंत्रणांनी घेतलेल्या आढाव्यानंतर सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलीस यांनी सुरक्षेसाठी चोख तयारी केली आहे.

अत्याधुनिक यंत्रणेचा वापर

संवेदशील ठिकाणी अप्रिय घटना टाळण्यासाठी मतदान काळात इंटरनेट सेवा बंद ठेवली आहे. तसेच, काही ठिकाणी बॅरिकेटींग करण्यात आले असून, सीसीटीव्हीचीही व्यवस्था करण्यात आली आहे. येणाजाणाऱ्या छोट्या मोठ्या वाहनांची तपासणीही अत्यंत बारकाईने केली जात आहे. सोमवारी जम्मू आणि लडाकसह संवेदनशील समजल्या जाणाऱ्या दक्षिण काश्मीर मधील चार जिल्ह्यात मतदान होईल. ज्या ठिकाणी मतदान पार पडणार आहे. त्या ठिकाणी गुप्तचर यंत्रणांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त अशी उपकरणे वापरली आहेत. जेणेकरून हल्लेखोर आणि मतदानात अडथळा आणणाऱ्या समाजकंटकांवर बारिक नजर ठेवणे सोपे जाईल.

पहिल्या टप्प्यात मतदान पार पडत असलेली महापालिका ठिकाणे

जम्मू, श्रीनगर, अनंतनाग, बारामुला, शोपियां आणि पुलवामा इत्यादी ठिकाणी मतदान पार पडत आहे. तर, काश्मीर खोऱ्यात कुपवाडा, हंदवाडा, बांदीपोला, बारामुला, चाडूरा, बडगाम, खानसाहिब, अचबल, देवसर, कोकरनाग, काजीगुंड आणि कलगाम. तसेच, जम्मू येथील - निश्नाह, अरनिया आरएस पुरा, अखूनर, खोर, ज्यूरियन, राजौरी, थानामांडी, सौशेरा, कालाकोटा, सुंदरबनी, पुंछ, आणि सरनकोट या ठिकाणीही मतदान होणार आहे.