भारतात होणाऱ्या आत्महत्येच्या प्रमाणात वाढ; जगात आत्महत्या करणारी ३ पैकी एक स्त्री भारतीय
(Photo Credit: Pixabay)

‘स्त्रियांसाठी असुरक्षित’ अशी भारताची प्रतिमा जगासमोर होती. निर्भया प्रकरणानंतर भारताला रेप कॅपिटल म्हणूनही ओळखले जाईल की काय अशी भीती देखील व्यक्त केली जात होती. त्या पाठोपाट आता भारतामध्ये आत्महत्या करण्याऱ्यांचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून आले आहे. लॅन्सेट पब्लिक हेल्थ जर्नलनं प्रसिद्ध केलेल्या एका आकडेवारीनुसार भारत्तात स्त्रियांचे आत्महत्या करण्याचे प्रमाण अतिशय वाढले आहे. जगातील ३ आत्महत्या करण्याऱ्या स्त्रियांपैकी एक स्त्री भारतीय असल्याचे धक्कादायक सत्य या रिपोर्टद्वारे समोर आले आहे. भारतातील स्त्रियांच्या आत्महत्येचे प्रमाण जगाच्या तुलनेत ३७ टक्के आहे तर पुरुषांचे प्रमाण २०१६ साली २४ टक्के इतके होते.

१९९०-२०१६ या गेल्या २५ वर्षांत भारतातील आत्महत्येच्या प्रमाणात ४० टक्क्यांनी वाढ झालेली दिसून आली आहे. यामध्ये १५-३९ वयोगातील स्त्रिया आणि तरुणांचे प्रमाण अधिक आहे. या वयोगटातील लोकांचे आत्महत्येचे प्रमाण हे ६३ टक्के असल्याचे दिसून आले आहे. या वयोगटात भारतामध्ये मृत्यू होण्यासाठी आत्महत्या हे मुख्य कारण असल्याचेही दिसून आले आहे. कारण २०१६ साली भारतात जवळ जवळ २,३०,३१४ इतक्या आत्महत्या झाल्याचे आढळले होते.

भारतातील एकूण राज्यांपैकी कर्नाटक राज्यात आत्महत्येचे प्रमाण सर्वात अधिक आहे. त्यानंतर तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगना, पश्चिम बंगाल आणि त्रिपुरा या राज्यांचा नंबर लागतो. तर जगात ग्रीनलँड, लेसोथो आणि युगांडा या देशांत सर्वात अधिक आत्महत्या होतात. आत्महत्या करणाऱ्या स्त्रियांमध्ये तरुण विवाहित स्त्रियांचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले आहे. त्यासाठी मुख्यतो मानसिक तणाव हे कारण असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे जागतिक आकडेवारीचा विचार केला तर विवाहित स्त्रिया आत्महत्या करण्याचे प्रमाण हे एकट्या स्त्रियांनी केलेल्या आत्महत्येपेक्षा कमी असते पण जागतिक आकडेवारीच्या दुप्पट विवाहित स्त्रिया भारतात आत्महत्या करताना दिसतात. म्हणजेच विवाहातून अपेक्षित असणारं मानसिक स्थैर्य, आनंद किंवा सुरक्षितता भारतीय तरुणींना अद्यापही मिळालेली नाही हे दिसून येते.