PM Modi (PC -X/ANI)

Lok Sabha Election 2024: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सोमवारी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावाला उत्तर दिले. यावेळी त्यांनी विरोधी पक्ष काँग्रेसवर हल्लाबोल करत आगामी लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) भाजप (BJP) बंपर जागा जिंकणार असल्याचा दावा केला. यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, आता आमच्या सरकारचा तिसरा कार्यकाळही दूर नाही. एप्रिल-मेमध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये भाजपने किमान 370 जागा जिंकेल. तर एनडीए 400 चा आकडा पार करेल, असं भाकितही पंतप्रधान मोदींनी यावेळी केलं.

माझ्या तिसऱ्या कार्यकाळात भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल - पंतप्रधान

यावेळी पंतप्रधानांनी देशाच्या अर्थव्यवस्थेशी संबंधित बदलांवर चर्चा करत विरोधकांवर निशाणा साधला. पंतप्रधान मोदी यांनी संसदेत सांगितले की, 10 वर्षांच्या कारभाराच्या अनुभवाच्या आधारे आपण असे म्हणू शकतो की आज देशाची अर्थव्यवस्था मजबूत आहे. आज भारत ज्या वेगाने प्रगती करत आहे, ते पाहता मी विश्वासाने सांगू शकतो की माझ्या तिसऱ्या कार्यकाळात भारत तिसरी सर्वात मोठी आर्थिक शक्ती बनेल. ही मोदींची हमी आहे. 10 वर्षात 25 कोटी लोक गरिबीतून बाहेर आले आहेत, यावरून देशाची क्षमता दिसून येते, असेही पंतप्रधानांनी यावेळी नमूद केले. (हेही वाचा -PM Narendra Modi यांच्याकडून Zakir Hussain, Rakesh Chaurasia, Shankar Mahadevan सह Grammy Award विजेत्या भारतीय कलाकारांच्या पाठीवर कौतुकाची थाप!)

तिसरी टर्म मोठ्या निर्णयांनी भरलेला असेल - पंतप्रधान

पुढे बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, आमचा तिसरा कार्यकाळ खूप मोठ्या निर्णयांनी परिपूर्ण असेल. मी लाल किल्ल्यावरून आणि राम मंदिराच्या उद्घाटनाच्या वेळी सांगितले होते की, आम्हाला देशाला समृद्ध आणि शिखरावर पाहायचे आहे. तिसरा कार्यकाळ हा एक हजार वर्षांचा मजबूत पाया घालण्याचा कार्यकाळ असेल.

पहा व्हिडिओ - 

विरोधकांची जबाबदारी पार पाडण्यात काँग्रेस अपयशी - पंतप्रधान

तुम्ही किती दिवस तुकड्या तुकड्यांमध्ये विचार करत राहणार, किती काळ समाजात फूट पाडत राहणार, तुम्ही देश खूप तोडला आहे. सोडताना निदान काही सकारात्मक गोष्टी तरी झाल्या असत्या तर बरे झाले असते, असा शब्दांत मोदींनी यावेळी विरोधकांवर टीका केली. तुम्ही प्रत्येक वेळेप्रमाणे देशाची घोर निराशा केली. आज विरोधकांच्या स्थितीचा सर्वात मोठा दोषी काँग्रेस पक्ष आहे. काँग्रेसला चांगला विरोधी पक्ष बनण्याची मोठी संधी होती, पण ती जबाबदारी पार पाडण्यात काँग्रेसला 10 वर्षांत अपयश आले, असंही मोदींनी यावेळी नमूद केलं.