Chamoli Road Accident: उत्तराखंडमधील चमोली येथे भीषण रस्ता अपघात; वाहनातील 10-12 जणांचा मृत्यू
Accident | (Photo Credit: Archived, edited, representative images)

Chamoli Road Accident: उत्तराखंडमधील (Uttarakhand) चमोली जिल्ह्यातील (Chamoli District) उरगम खोऱ्यात निर्माणाधीन उर्गम-पल्ला जाखोला मोटरवेवर एक भीषण अपघात (Accident) झाला. शुक्रवारी सायंकाळी पल्ला गावाजवळ मॅक्स वाहनाचा अपघात होऊन ते खोल दरीत कोसळले. या वाहनातील 12 ते 13 जणांचा मृत्यू झाला. अपघातापूर्वी एक व्यक्ती खाली उतरली होती, तर मॅक्सच्या छतावर बसलेल्या दोन मजूर आणि दोन स्थानिकांनी खड्ड्यात पडण्यापूर्वी उडी मारून आपला जीव वाचवला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी एक मॅक्स जोशीमठहून किमणा गावाकडे प्रवाशांसह जात होती. दुपारी 3:30 च्या सुमारास, मॅक्स पल्ला गावाजवळील एका उंच चढणीवर पुढे जाण्यात अयशस्वी झाला. मॅक्स मागे सरकताना पाहून त्यावर स्वार असलेले किमणा गावातील जितपाल सिंग यांनी वाहनाला मागच्या टायच्या बाजूने दगड लावण्यास सुरुवात केली. ओव्हरलोडमुळे वाहन दगड ओलांडून वेगाने खाली गेले. यादरम्यान चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. काही सेकंदात, मॅक्स 500 मीटर दरीत कोसळला. (हेही वाचा - Gas Leak in Government College Lab: हैदराबादमधील कस्तुरबा कॉलेजच्या प्रयोगशाळेत रासायनिक वायू गळती; 25 विद्यार्थी बेशुद्ध)

या अपघातात वाहनाचे प्रचंड नुकसान झाले. या संदर्भात माहिती मिळताच एनडीआरएफ आणि एसडीआरएफची टीम घटनास्थळी पोहोचली आणि त्यांनी बचावकार्य सुरू केले. रात्री उशिरापर्यंत 12 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. तसेच चार जखमींना बाहेर काढण्यात आले असून त्यांना उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र उरगाव येथे आणण्यात आले आहे. रात्री उशिरापर्यंत एनडीआरएफ, एसडीआरएफचे पथक तसेच स्थानिक लोक बचाव कार्यात गुंतले होते. या अपघाताची माहिती मिळताच डीएम हिमांशू खुराना आणि एसपी प्रमेंद्र डोबलही घटनास्थळी पोहोचले.

दरम्यान, 11 किलोमीटर लांबीच्या उरगम-पल्ला जाखोला रस्त्याचे काम 2020 पासून सुरू आहे. सध्या नऊ किलोमीटर अंतरावर असलेल्या उचो ग्वाड गावाजवळील रस्त्यावर बांधकाम सुरू आहे. बहुतेक रस्त्यावर खडी टाकण्यात आली आहे. पल्ला जाखोला गावचे माजी प्रमुख हर्षवर्धन झिनक्वान यांनी सांगितले की, ज्या ठिकाणी हा अपघात झाला, तेथे खडी टाकण्यात आली होती. येथील डांग गडेरे पुलाचे काम सुरू आहे.