Shahrukh Khan Scholarship: ऑस्ट्रेलियाची La Trobe University देत आहे शाहरुख खानच्या नावाने शिष्यवृती; जाणून घ्या कोण करू शकतो अर्ज
शाहरुख खान (Photo credit: Twitter @ShahRukhKhanFC)

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची (Shah Rukh Khan) क्रेझ फक्त भारतातच नाही तर परदेशातही त्याच्या चाहत्यांची संख्या लाखोंच्या घरात आहे. एक उत्तम अभिनेता असण्यासोबतच शाहरुख खान एक व्यक्ती म्हणूनही लोकप्रिय आहे. लोककल्याणाच्या कामात त्याचा सक्रिय सहभाग असतो. आता शाहरुख खानच्या नावाने देण्यात येणारी शिष्यवृत्ती (Shah Rukh Khan’s Scholarship) पुन्हा एकदा जाहीर करण्यात आली आहे. ही शिष्यवृत्ती मेलबर्नच्या भारतीय चित्रपट महोत्सव आणि ला ट्रोब विद्यापीठाच्या (La Trobe University) भागीदारीत दिली जाते. 2019 मध्ये पहिल्यांदा ही शिष्यवृत्ती जाहीर करण्यात आली होती.

या शिष्यवृत्तीची घोषणा विद्यापीठाच्या एका कार्यक्रमादरम्यान करण्यात आली होती, ज्यामध्ये शाहरुख खान प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होता. त्यानंतर, केरळमधील त्रिशूर येथील रहिवासी असलेल्या गोपिका कोट्टंथारायल भासी यांना प्रथमच ही शिष्यवृत्ती देण्यात आली. वृत्तानुसार, ला ट्रोब विद्यापीठाकडून या शिष्यवृत्तीसाठी सध्या सर्वाधिक अर्ज आल्याचे सांगण्यात आले. यासाठी सुमारे 800 अर्जदारांनी अर्ज केले. साथीच्या रोगामुळे आणि प्रवासावरील निर्बंधांमुळे ही शिष्यवृती गेल्या वर्षी थांबवण्यात आली होती. मात्र, आता परिस्थिती सामान्य झाल्यानंतर आता पुन्हा एकदा ही शिष्यवृत्ती जाहीर करण्यात आली आहे.

या शिष्यवृत्तीसाठी फक्त अशा महिलाच अर्ज करू शकतात, ज्यांच्याकडे भारतीय नागरिकत्व आहे. तसेच, महिलेला पदव्युत्तर पदवी मिळून 10 वर्षांपेक्षा कमी कालावधी झाला असावा. निवडलेल्या उमेदवाराला चार वर्षांची ला ट्रोब युनिव्हर्सिटी फुल-फी रिसर्च स्कॉलरशिप मिळेल. या शिष्यवृत्तीसाठी 18 ऑगस्ट 2022 पासून नोंदणी सुरू झाली आहे आणि ती 23 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. (हेही वाचा: अक्षय कुमारचा 'राम सेतू' चित्रपट वादाच्या भोवऱ्यात; भाजप नेते Subramanian Swamy यांनी पाठवली कायदेशीर नोटीस)

इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्न दिग्दर्शक मीतू भौमिक म्हणतात, ‘आपल्या सर्वांना माहित आहे की शाहरुखचे हृदय मोठे आहे आणि त्याने ते पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. ही शिष्यवृत्ती भारतातील महिला संशोधकासाठी आयुष्य बदलणारी संधी आहे. भारत टॅलेंटने भरलेला आहे आणि त्यांना फक्त संधी देण्याची गरज आहे.’