Ease of Doing Business Report World Bank (Photo Credit - Wikimedia Commons)

Ease of Doing Business Report: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या मेक इन इंडिया (Make in India) या मोहिमेचा परिणाम आता दिसायला लागला आहे. जागतिक बँकेने दिलेल्या 'इज ऑफ डुईंग बिजनेस' अहवालानुसार, भारत 63 व्या क्रमांकावर पोहचला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा भारताने 14 क्रमांकांने आघाडी घेतली आहे. 2018 मध्ये भारत 77 व्या स्थानावर होता. म्हणजेच आता भारतामध्ये व्यवसाय करणे सोपे झाले आहे. तसेच 2014 मध्ये 190 देशांच्या यादीत भारत 142 व्या क्रमांकांरवर होता.

‘इज ऑफ डुइंग बिझनेस’च्या यादीत भारताने सलग तिसऱ्यांदा मोठी झेप घेतली आहे. मागील वर्षी भारताने या क्रमवारीत 23 स्थानांची प्रगती करत 77 वे स्थान पटकावले होते. तर 2017 मध्ये भारत या क्रमवारीत 100 व्या स्थानावर होता. यंदा भारताने इज ऑफ डुइंग बिझनेस यादीत आपले स्थान अधिक भक्कम केले आहे.

विदेशातील पैसा मायदेशी पाठवण्यात भारतीय आघाडीवर: जागतिक बँक

व्यवसायांसाठी अनुकूल परिस्थिती असलेल्या 190 देशांची क्रमवारी जागतिक बँकेकडून प्रसिद्ध करण्यात येत असते. या क्रमवारीमध्ये 2014 साली भारत 142 व्या क्रमांकावर होता. त्यानंतरच्या काळात भारताने या क्रमवारीत सातत्याने सुधारणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2018 यांनी इज ऑफ डुइंग बिझनेसच्या क्रमवारीत पुढच्या दोन वर्षांत अव्वल 50 देशांमध्ये पोहोचण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

जागतिक बँकेने व्यवसाय आणि उद्योगांमध्ये सुधारणा करणाऱ्या पहिल्या वीस देशांची यादी तयार केली आहे. मे 2019 मध्ये संपलेल्या वर्षभराच्या अवधीमध्ये केलेल्या कामगिरीच्या आधारे हे मूल्यांकन करण्यात आले आहे. लघु आणि मध्यम उद्योगांना आपला व्यवसाय करता यावा, त्यांची कामगिरी सुधारण्यासाठी त्यांना मदत करण्यासाठी उचललेल्या पावलांच्या आधारेही मूल्यांकन करण्यात आले आहे. जागतिक बँकेच्या मते यंदा भारताने 'इज ऑफ डुइंग बिझनेस'साठी केलेली कामगिरी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने करण्यात येणाऱ्या प्रयत्नांचे फळ आहे.