डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर (Anand Raj Ambedkar) यांनी कॉंग्रेसमध्ये (Congress) प्रवेश केला आहे. शनिवारी, दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित (Sheila Dikshit) यांच्या उपस्थितीत हा प्रवेशसोहळा पार पडला. आंबेडकर यांच्यासह रिपब्लिकन सेनेचे दिल्ली विभागाचे अध्यक्ष राकेश प्रजापती, तसेच हजारो समर्थकांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी आंबेडकर यांनी दिल्लीतील सातही लोकसभा जागांवरील उमेदवार मागे घेतले जाण्याची घोषणा केली. आनंदराज आंबेडकर आणि त्यांच्या समर्थकांच्या कॉंग्रेसप्रवेशाने दिल्ली कॉंग्रेसची ताकद वाढली असल्याचे मत शीला दीक्षित यांनी व्यक्त केले.
यावेळी बोलताना आनंदराज आंबेडकर म्हणाले, ‘डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न केवळ काँग्रेसच पूर्ण करू शकते, त्यामुळे आपण काँग्रेस प्रवेशाचा निर्णय घेतला. आता दिल्लीतील सात मतदारसंघात काँग्रेसला विजयी करण्यासाठी काम आपण करणार आहोत.' काही दिवसांपूर्वी आनंदराज यांनी सोलापूरमध्ये प्रकाश आंबेडकर यांना प्रचारात साथ दिली होती, त्यामुळे आता हा कॉंग्रेसप्रवेश सर्वांच्या भुवया उंचावणारा ठरला आहे.
दरम्यान, घोंडा विधानसभा मतदारसंघातील भाजपचे माजी आमदार बीटी शर्मा (BT Sharma) आणि दिल्ली प्रदेश पूर्वांचल गण परिषदेचे अध्यक्ष निर्मल पाठकही त्यांच्या समर्थकांसह काँग्रेसमध्ये सामील झाले. यावेळी, ‘पक्षात प्रवेश केलेल्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना देशाच्या विकासासाठी कॉंग्रेस आणि राहुल गांधी यांचा तत्वांवर विश्वास आहे’, असे शीला दीक्षित म्हणाल्या.