Delhi CM Atishi Oath Ceremony: दिल्लीला आज मिळणार नवीन मुख्यमंत्री; आप नेत्या आतिशी राजनिवास येथे दुपारी 4.30 वाजता घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ
तसेच त्यांनी लेफ्टनंट गव्हर्नर यांच्याकडे शपथविधीची तारीख निश्चित करण्याची मागणी केली होती. आज त्यांच्यासोबत पाच कॅबिनेट मंत्री शपथ घेणार आहेत.
Delhi CM Atishi Oath Ceremony: दिल्लीला आज नवा मुख्यमंत्री मिळणार आहे. आम आदमी पार्टी (AAP) च्या नेत्या आतिशी मार्लेना (Atishi Marlena) आज दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची (Chief Minister of Delhi) शपथ घेणार आहेत. आतिशी यांचा शपथविधी सोहळा (Atishi Swearing Ceremony) दुपारी साडेचार वाजता राज निवास (Raj Niwas) येथे होणार आहे. अतिशी यांच्यासोबतच त्यांचे मंत्रिमंडळही शपथ घेणार आहे. यामध्ये इम्रान हुसैन, कैलाश गेहलोत, गोपाल राय, मुकेश कुमार आणि सौरभ भारद्वाज यांचा समावेश असेल.
अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आतिशी यांची आम आदमी पक्षाच्या विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे. विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड झाल्यानंतर, आतिशी यांनी नवीन सरकार स्थापन करण्याचा दावा केला. तसेच त्यांनी लेफ्टनंट गव्हर्नर यांच्याकडे शपथविधीची तारीख निश्चित करण्याची मागणी केली होती. आज त्यांच्यासोबत पाच कॅबिनेट मंत्री शपथ घेणार आहेत. हे कॅबिनेट मंत्री नवीन सरकारची दिशा आणि धोरणे ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील. (हेही वाचा -Who Is Atishi Marlena: कोण आहेत आतिशी मार्लेना? ज्यांना अरविंद केजरीवाल यांनी उत्तराधिकारी म्हणून निवडले)
आतिशी ठरणार दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री -
आतिशी या दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री असतील. याआधी भाजपच्या सुषमा स्वराज आणि काँग्रेसच्या शीला दीक्षित यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाच्या धुरा सांभाळल्या होत्या. सुषमा स्वराज यांचा कार्यकाळ खूपच कमी होता. परंतु, शीला दीक्षित या 15 वर्षे दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या. (हेही वाचा - Atishi Marlena Net Worth: अतिशी मार्लेना यांची एकूण संपत्ती किती? दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्र्याचे शिक्षण काय?)
केजरीवाल यांनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा -
आतिशी सरकारचा कार्यकाळ फार काळ नसणार आहे. वास्तविक, पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये दिल्लीत विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे पुढच्या कार्यकाळात आम आदमी पक्ष पुन्हा एकदा सत्तेत आला तर अरविंद केजरीवाल मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर विराजमान होण्याची शक्यता आहे. अरविंद केजरीवाल यांनी रविवारी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली होती. जोपर्यंत दिल्लीची जनता त्यांना प्रामाणिकपणाचे प्रमाणपत्र देत नाही तोपर्यंत मी मुख्यमंत्रीपदावर बसणार नसल्याचे केजरीवाल यांनी म्हटले होते. या घोषणेनंतर केजरीवाल यांनी राज्यपालाची भेट घेऊन मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. सध्या आतिशी दिल्लीच्या वित्त, शिक्षण आणि सार्वजनिक बांधकाम विभागासह अनेक विभागांच्या जबाबदाऱ्या सांभाळत आहेत.