धक्कादायक! दिल्लीतील भजनपुरा भागात एका घरात सापडले 5 जणांचे मृतदेह
प्रतिकात्मक प्रतिमा | (Photo Credits: ANI)

उत्तर-पूर्व दिल्लीच्या भजनपुरा भागामधील एका घरात 5 जणांचे कुजलेले मृतदेह सापडले आहेत. या धक्कादायक घटनेमुळे भजनपुरा परिसरात (Bhajanpura Area) एकच खळबळ उडाली आहे. हे सर्व जण एकाच कुटुंबातील असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी हे 5 मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. यासंदर्भात एएनआय या वृत्तसंस्थेने वृत्त दिले आहे.

या 5 जणांची हत्या करण्यात आली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवलेला आहे. आज पोलिसांना भजनपुरा भागातील एका घरामध्ये 5 जणांचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडले. यामध्ये 2 महिला मृतदेहांचाही समावेश आहे. काही दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये एका कुटुंबातील 11 सदस्यांनी सामूहित आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती. त्यानंतर आज उघडकीस आलेल्या या प्रकारामुळे दिल्लीमध्ये खळबळ उडाली आहे. (हेही वाचा - महाराष्ट्र राज्य सरकार कर्मचार्‍यांसाठी 29 फेब्रुवारीपासून होणार 5 दिवसांचा आठवडा; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय)

भजनपुरा भागात सापडेल्या या मृतदेहांपैकी एक पुरुष रिक्षा चालक होता, असे सांगण्यात येत आहे. अद्याप या घटनेमागचे कोडे उलगडणे अशक्य आहे. मात्र, शवविच्छेदनाच्या अहवालामध्ये ही हत्या होती की, सामूहिक आत्महत्या याबाबत समजण्यास मदत होणार आहे. 2 वर्षांपूर्वी दिल्लीमध्ये बुऱ्हाडी भागामध्ये एका घरामध्ये 11 जणांचे मृतदेह आढळलेले होते. हे सर्वजण एकाच कुटुंबातील होते.