Congress Expels Acharya Pramod Krishnam: काँग्रेसने आचार्य प्रमोद कृष्णमला दाखवला बाहेरचा रस्ता; पक्षविरोधी वक्तव्यानंतर करण्यात आली कारवाई
Acharya Pramod Krishnam (PC - Wikimedia Commons)

Congress Expels Acharya Pramod Krishnam: काँग्रेस (Congress) ने ज्येष्ठ नेते आचार्य प्रमोद कृष्णम (Acharya Pramod Krishnam) यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. आचार्य प्रमोद कृष्णम यांची पक्षाने 6 वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी केली आहे. कृष्णम यांनी नुकतीच पीएम मोदींची (PM Modi) भेट घेऊन त्यांचे कौतुक केले होते. तसेच इतर कॅबिनेट मंत्र्यांचीही भेट घेतली होती. अनुशासनहीनतेच्या तक्रारी आणि पक्षाविरोधात वारंवार वक्तव्ये होत असल्याच्या तक्रारी लक्षात घेऊन काँग्रेस अध्यक्षांनी प्रमोद कृष्णम यांची पक्षातून 6 वर्षांसाठी हकालपट्टी करण्याच्या उत्तर प्रदेश काँग्रेस कमिटीच्या प्रस्तावाला तत्काळ प्रभावाने मंजुरी दिली आहे, असं काँग्रेसने म्हटले आहे. यामुळे आता आचार्य प्रमोद कृष्णम आणि काँग्रेसचा 39 वर्षांचा संबंध संपुष्टात आला आहे.

काँग्रेसमधून हकालपट्टीनंतर आचार्य कृष्णम यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 'राम' आणि 'राष्ट्रा'बाबत तडजोड होऊ शकत नाही, असं कृष्णम यांनी म्हटलं आहे. प्रमोद कृष्णम यांची गणना प्रियंका गांधी यांच्या जवळच्या व्यक्तींमध्ये करण्यात येत होती. प्रमोद कृष्णम हे 1993 मध्ये काँग्रेसकडून संभल विधानसभेचे दावेदार होते. आचार्य प्रमोद कृष्णम यांनी 2014 मध्ये संभलमधून आणि 2019 मध्ये लखनऊमधून काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवली होती. (हेही वाचा - PM Modi in Lok Sabha: गेले पाच वर्षे 'रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म'मध्ये गेली; पंतप्रधान मोदींनी केलं लोकसभेला संबोधित)

काँग्रेसवर टीका केल्याने पक्षातून हकालपट्टी -

आचार्य प्रमोद कृष्णम हे अनेक दिवसांपासून काँग्रेसवर हल्लाबोल करत होते. ते आपल्याच पक्षाच्या नेत्यांना लक्ष्य करत होते. काँग्रेसमध्ये हिंदू शब्दाचा द्वेष करणारे काही मोठे नेते आहेत. काँग्रेसचे काही नेते असे आहेत जे केवळ राम मंदिराचाच नव्हे तर प्रभू रामाचाही द्वेष करतात, असं आचार्य कृष्णम यांनी म्हटलं होतं. (हेही वाचा -Baba Siddiqui Joins NCP: अजित पवार यांच्या उपस्थितीत बाबा सिद्दीकी यांचा राष्ट्रवादीत प्रवेश)

एएनआय या वृत्तसंस्थेशी संवाद साधताना आचार्य कृष्णम म्हणाले होते की, कोणीही मंदिरात जाऊन हिंदू होत नाही आणि मशिदीत जाऊन कोणी मुस्लिम होत नाही. जो येशूवर विश्वास ठेवत नाही तो ख्रिश्चन असू शकत नाही आणि जो पैगंबरांवर विश्वास ठेवत नाही तो मुस्लिम असू शकत नाही, त्याचप्रमाणे जो भगवान रामाचा द्वेष करतो तो हिंदू असू शकत नाही. संपूर्ण जगाला माहित आहे की राम मंदिराचे बांधकाम रोखण्यासाठी प्रयत्न केले गेले, त्यामुळे सनातन धर्म मानणाऱ्या करोडो लोकांच्या श्रद्धेला धक्का बसला आहे.

आचार्य प्रमोद कृष्णम यांनी नुकतेच मल्लिकार्जुन खर्गे यांच्यावर देखील निशाना साधला होता. मोठ्या नेत्याने आपली शैली आणि भाषा सांभाळली पाहिजे. कार्यकर्त्यांमधून पक्ष निर्माण होतो. कार्यकर्ता मेहनती आणि धाडसी असतो. त्यांच्याबद्दल वापरण्यात आलेल्या भाषेने माझ्या मनालाच नव्हे तर सर्व कार्यकर्त्यांची मने दुखावली आहेत, असं आचार्य कृष्णम यांनी म्हटलं होतं.