विमानताळावरुन घरी जाणाऱ्या तरुणाला वेळ विचारुन चोरांनी लुटले
फोटो सौजन्य- Pixabay

विमानतळावरुन रात्री उशिरा घरी जाणाऱ्या एका तरुणाला दोन चोरांनी वेळ विचारुन लुटल्याची घटना घडली आहे. तसेच या तरुणाला बंदुकीचा धाक दाखवून चोर पसार झाल्याचे या पीडित तरुणाने पोलिसांना सांगितले आहे.

प्रशांत खरे असे या तरुणाचे नाव असून तो मध्यप्रदेशात राहतो. तसेच प्रशांत हा एका ट्रॅव्हल कंपनीमध्ये  काम करतो. रविवारी रात्री उशिरा विमानतळावरुन घरी जाताना वाटेत त्याला दोन दारुड्यांनी अडवले. परंतु ते चोरी करणार असल्याचा संशय येऊ नये म्हणून या दोघांनी प्रशांतला आधी किती वाजले आहेत हे विचारले. त्यानंतर त्याचा खिशातील पाकिट आणि मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेतला. मात्र प्रशांत त्यांच्यावर हल्ला करणार इतक्यात या दोन चोरांनी त्यांच्या जवळ असलेल्या बंदुकीचा धाक दाखवत तेथून पळ काढला आहे.

या घटनेतील पीडित तरुणाने स्थानिक पोलिसात या दोन अज्ञात चोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेच चोरांनी पोलिसांना या प्रकरणी कळवल्यास जीवे मारुन टाकण्याची धमकीसुद्धा प्रशांतला दिली असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले आहे. त्यामुळे पोलीस आता या दोन भामट्यांचा शोध सीसीटिव्हीचे फुटेज तपासून करत असल्याचे सांगितले आहे.