राजस्थान: बाडमेर जिल्ह्यात 15 वर्षीय मुलीचे अपहरण करून बलात्कार; लज्जास्पद कृत्याचा नराधमाच्या साथीदाराने काढला व्हिडिओ
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: ANI)

देशभरात मुलींवर बलात्काराच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. त्यामुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे दलित मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना ताजी असतानाचं आता राजस्थानच्या (Rajasthan) बाडमेर जिल्ह्यातील (Barmer District) बलात्काराच्या (Rape) घटनेने सर्वांना हादरवून टाकले आहे. बाडमेर जिल्ह्यातील शिव पोलिस स्टेशन परिसरातील एका गावात अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली आहे.

प्राप्त माहितीनुसार, ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी पीडितेच्या कुटुंबातील अन्य सदस्य मतदान करण्यासाठी गेले होते. कुटूंबाच्या तक्रारीनुसार, पोलिसांनी आरोपींवर पोक्सो अ‍ॅक्ट आणि आयटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. तसेच जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षकांनी पीडितेची व तिच्या कुटुंबीयांची शासकीय रूग्णालयात भेट घेतली असून आरोपीचा तपास सुरू केला आहे. (हेही वाचा - उत्तर प्रदेशातील हाथरस, बलरामपूर घटनेनंतर आता प्रतापगडमध्ये 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार; आरोपीला अटक)

या घटनेतील आरोपींचा तपास करण्यासाठी पोलिसांनी स्वतंत्र पथक तयार केले आहे. पोलिस अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, 15 वर्षीय मुलगी घरातून बेपत्ता झाल्याची तक्रार भीड चौकी येथे देण्यात आली होती. मुलीचा शोध घेतल्यानंतर ती गावातील एका शाळेजवळ बेशुद्ध अवस्थेत आढळली. पोलिसांना प्राथमिक उपचारानंतर तिला जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

दरम्यान, शुद्धीवर आल्यावर पीडितेने दोन मुलांनी आपल्याला जबरदस्तीने पळवून नेल्याचे सांगितले. यातील एका मुलाने माझ्यावर बलात्कार केला आणि एकाने या घटनेचा व्हिडिओ बनवला. या प्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.

जिल्हाधिकारी विश्राम मीणा यांनी सांगितले की, पंचायतीराज निवडणुकीच्या तिसर्‍या टप्प्यातील मतदान सुरू होते. त्यामुळे कुटुंबातील सदस्य मत देण्यासाठी गेले होते. त्यावेळी दोन मुलांनी पीडित मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून स्वतंत्र पथके तयार करून आरोपीचा शोध सुरू केला आहे. संशयितांची चौकशी केली जात आहे, असंही मीणा यांनी म्हटलं आहे.