धक्कादायक! जादूटोण्याच्या संशयावरून खाऊ घातली मानवी विष्टा, उपटून काढले दात; 29 जणांना अटक
Odisha (Photo Credits: ANI)

समाजावर अंधश्रद्धेच्या (Superstitions) असलेल्या प्रभावामुळे अनेक गैरकृत्य घडल्याच्या बातम्या आपण नेहमीच पाहतो. यामध्ये अजून एका बातमीने भर पडली आहे. जादूटोणा (Witchcraft) केल्याच्या संशयावरून ग्रामस्थांनी सहा जणांना मानवी विष्टा (Human Excreta) खाऊ घातल्याचा तसेच त्यांचे दात ओढून काढण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ओडिशा (Odisha) राज्यातील गोपापूर, खल्लीकोट येथे हा प्रकार घडला आहे. याबाबत पोलिसांनी 29 जणांना ताब्यात घेतले आहे. महत्वाचे म्हणजे या कृत्यामध्ये 22 महिलांचा समावेश आहे.

गंजम जिल्ह्यातील गोपापूर गावातल्या काही लोकांना संशय आला की, गावातील सहा ज्येष्ठ व्यक्ती जादूटोना करीत आहेत. परिसरातील सहा महिलांचा मृत्यू झाला होता, तर इतर सात जण आजारी पडले होते. यावरून हा संशय आणखी बळावला. यामुळे मंगळवारी ग्रामस्थांनी या सहा जणांना घरातून जबरदस्तीने बाहेर काढले. त्यानंतर मानवी मलमूत्र, विष्टा खाण्यास भाग पाडले. इतकेच नाही तर त्यांचे दातही उपटून काढण्यात आले. हे सर्व होत असताना हे सहाही जण मदतीसाठी याचना करत होते, मात्र त्यांच्या मदतीसाठी कोणीही पुढे आले नाही. (हेही वाचा: अंधश्रद्धेचा बळी; शरीरातून आत्मा बाहेर काढणार सांगून तांत्रिकाने फोडले महिलेचे नाक आणि डोळे, त्रिशुळाने भोकसून केला खून)

ही बातमी जिल्हा मुख्यालयापर्यंत पोहोचताच पोलिस अधीक्षक ब्रजेश राय पोलिस पथकासह गावात पोहोचले. त्यानंतर त्यांनी या सर्व सहाही जणांन या कृत्यापासून वाचवले. चौकशीनंतर या प्रकरणात 29 जणांना अटक करण्यात आली आहे. या भागात पोलिसांची गस्त अजून वाढवण्यात आली असून, पोलीस उर्वरीत दोषींचा शोध घेत आहेत.