Shark Tank India Season 2 Promo: लवकरच सुरु होणार शार्क टँक इंडिया सीझन 2; समोर आला प्रोमो, Ashneer Grover ला वगळले
Shark Tank India Season 2 (Photo Credit : Twitter)

नवोदित व्यावसायिकांना त्यांच्या नवीन कल्पना सुरू करण्यास मदत करणारे ‘शार्क टँक इंडिया’, त्याच्या दुसऱ्या सीझनसह (Shark Tank India 2) परत येण्यासाठी सज्ज आहे. शार्क टँक इंडिया पुन्हा एकदा व्यावसायिक इच्छुकांना त्यांची उद्योजकीय स्वप्ने पूर्ण करण्याची संधी देणार आहे. देशभरातील नवउद्योजकांना त्यांच्या कल्पना अनुभवी गुंतवणूकदार आणि व्यावसायिक तज्ञांसमोर मांडण्याची एक मोठी संधी हा शो प्रदान करतो. या शोचा पहिला सिझन अतिशय लोकप्रिय ठरला होता. नुकताच शोच्या दुसऱ्या सिझनचा प्रोमो समोर आला आहे.

या नव्या सिझनमध्ये गेल्या हंगामातील प्रसिद्ध शार्क अश्नीर ग्रोव्हरला शोमधून काढून टाकण्यात आले आहे आणि त्याच्या जागी नवीन उद्योगपतीचे नाव देण्यात आले आहे. 'शार्क टँक इंडिया'च्या पहिल्या सीझनमध्ये 'भारत पे'चा संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक अश्नीर ग्रोवरला भरपूर लोकप्रियता मिळाली. त्यानंतर त्याच्या कंपनीतल्या गोंधळामुळे तो प्रसिद्धीच्या झोतात आला होता. आता त्याला शोमधून ब्रेक देण्यात आला आहे.

शोच्या दुसऱ्या सीझनमध्ये विनिता सिंग, पीयूष बन्सल, नमिता थापर, अनुपम मित्तल, अमन गुप्ता शार्क असणार आहेत. 'शार्क टँक इंडिया'च्या दुसऱ्या सीझनमध्ये दाखल झालेला नवीन शार्क म्हणजे कार देखो ग्रुपचे सीईओ आणि सह-संस्थापक अमित जैन. स्टँड अप कॉमेडियन राहुल दुआ हा शो होस्ट करणार आहे. या शोचे आतापर्यंत परदेशात 12 सीझन झाले आहेत.

तथाकथित नवोदित व्यावसायिक आपल्या व्यवसायासाठी गुंतवणूक शोधण्यासाठी या शोमध्ये येतात. उदयोन्मुख कंपन्यांमध्ये (स्टार्टअप्स) गुंतवणूक करणाऱ्या या व्यावसायिकांना शोमध्ये 'शार्क' असे नाव देण्यात आले आहे आणि हे लोक या शोमध्ये आपली कल्पना घेऊन येणाऱ्या व्यावसायिकाच्या व्यवसायात गुंतवणूक करायची की नाही हे ठरवतात. (हेही वाचा: FIFA World Cup Final: फिफाकडून अभिनेता Ranveer Singh ला निमंत्रण; वर्ल्ड कप फायनलमध्ये करणार भारताचे प्रतिनिधित्व)

'शार्क टँक' हा बिझनेस रिअॅलिटी शो पहिल्यांदा मार्क बर्नेटने 2009 मध्ये तयार केला होता. शोची पिच लाइन अगदी सोपी होती. विविध व्यवसायांमध्ये गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार या शोमध्ये न्यायाधीश म्हणून काम करतील आणि शोमध्ये येणाऱ्या आपल्याला योग्य वाटेल अशा व्यवसायामध्ये गुंतवणूक करतील. यातील काही जज शोमध्ये हजर राहण्यासाठी मानधन घेत असल्याची चर्चाही समोर आली आहे. हा शो प्रथम एबीसीने प्रदर्शित केला होता.