Well Done Baby Trailer: पुष्कर जोग व अमृता खानविलकर यांच्या 'वेल डन बेबी'चा ट्रेलर प्रदर्शित; खळखळून हसवत भावनिक करणारा प्रवास (Watch Video)  

या चित्रपटामध्ये एक आधुनिक मॉर्डन दांपत्य (अमृता खानविलकर आणि पुष्कर जोग) स्वतःच्या लग्नाचा उद्देश शोधण्यासाठी धडपडत आहेत

Well Done Baby Trailer (file Image)

अमेझॉन प्राईम व्हिडीओने (Amazon Prime Video) नुकतेच बहुप्रतिक्षित मराठी चित्रपट 'वेल डन बेबी'च्या (Well Done Baby) प्रीमियरची घोषणा केली होती. पुष्कर जोग (Pushkar Jog), अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) आणि वंदना गुप्ते (Vandana Gupte) या मराठी चित्रपटसृष्टीतील प्रमुख कलावंतांच्या भूमिका असणाऱ्या या चित्रपटाचा ट्रेलर आज प्रदर्शित करण्यात आला. अॅमेझॉन प्राइम स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर गुडी पाडव्याच्या मुहूर्तावर, 9 एप्रिल 2021 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. प्रियंका तंवर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून, हा चित्रपट जितका खळखळून हसवणारा आहे तितकाच तो भावनिकही असल्याचे ट्रेलरवरून दिसून येते.

‘वेल डोन बेबी’ ही एका वास्तविक कुटुंबाकडून प्रेरणा घेऊन गुंफलेली एक हृदयस्पर्शी अशी कथा आहे. या चित्रपटामध्ये एक आधुनिक मॉर्डन दांपत्य (अमृता खानविलकर आणि पुष्कर जोग) स्वतःच्या लग्नाचा उद्देश शोधण्यासाठी धडपडत आहेत. या प्रवासात पुढे दोघांमध्ये भांडणे होऊन गोष्ट घटस्फोटापर्यंत जाते. याच दरम्यान त्यांना बाळ होणार असल्याचे समजते व तिथून पुढे गोष्टी कशा बदलतात हे दर्शवण्यात आले आहे. 'तेच नाते... तेच ऋणानुबंध... पुन्हा नव्याने शोधूया' असं कॅप्शन देत चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले.

आनंद पंडित, मोहन नादार आणि पुष्कर जोग यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून हा चित्रपट व्हिडीओ पॅलेसतर्फे सादर करण्यात येणार आहे. या कौटुंबिक चित्रपटाबाबत बोलताना अभिनेता आणि निर्माता पुष्कर जोग म्हणाला. ‘वेल डन बेबी’ हा माझ्यासाठी खूप खास चित्रपट आहे. कथा आणि भूमिकेच्या बाबतीत हा भावनिक रोलरकास्टर होता. मला आनंद आहे की शेवटी मला ही गोष्ट आमच्या प्रेक्षकांना अमेझॉन प्राइम व्हिडिओवर दर्शविण्याची संधी मिळाली. मला आशा आहे की प्रत्येकजण आपल्या प्रियजनांसोबत या कौटुंबिक मनोरंजनाचा आनंद घेईल.’