मराठीतील पहिला वहिला 'लिपलॉक किसिंग सीन' केलेला राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त सिनेमा 'जोगवा' ला आज 10 वर्षे पुर्ण झाली. देवीला अर्पण केलेली मुले-मुली या अनिष्ट रुढींवर प्रकाश टाकणा-या विषयावर हा चित्रपट बनविण्यात आला होता. 25 सप्टेंबर 2009 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांची कौतुकाची थाप आणि समीक्षकांची वाहवा मिळवली होती. या चित्रपटाने 2009 मध्ये तब्बल 5 राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते. राजीव पाटील (Rajiv Patil) दिग्दर्शित या चित्रपटात अभिनेता उपेंद्र लिमये (Upendra Limaye) आणि अभिनेत्री मुक्ता बर्वे (Mukta Barve) यांनी प्रमुख भूमिका केल्या होत्या. आज या चित्रपटाला 10 वर्ष पुर्ण झाल्याच्या निमित्ताने अभिनेत्री मुक्ता बर्वे हिने या चित्रपटातील काही अविस्मरणीय अशा आठवणींना उजाळा देण्यासाठी या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचे काही फोटो आपल्या सोशल अकाउंटवरुन शेअर करत आहे.
यात तिने शेअर केलेल्या पोस्टमध्ये तिने असं म्हटलं आहे की, "आज सकाळी वाचलं की जोगवा १० वर्षाचा झाला.. बापरे ..इतकी वर्ष झाली! काही projects, roles , process , त्यातली माणसं इतकी जवळची असतात की सगळ्या आठवणी कालच्याच वाटतात." त्यामुळे त्या आठवणींना उजाळा देण्यासाठी या जोगवाच्या शूटिंग दरम्यानच्या काही आठवणी तिने शेअर केल्या आहेत.
देवदासी प्रथेवर समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन या चित्रपटातून मांडण्यात आला होता. या चित्रपटाला ‘सामाजिक जागृती करणारा सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट गायक, सर्वोत्कृष्ट गायिका, सर्वोत्कृष्ट संगीतकार’ असे पाच राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते. हेही वाचा- Smile Please Anolkhi Song: नात्यांतील गुंफण अलगदपणे मांडणारे 'अनोळखी' गाणे प्रेक्षकांच्या भेटीला
जोगवा या सिनेमात मुक्ता आणि उपेंद्र सह ज्येष्ठ अभिनेते विनय आपटे, प्रिया बेर्ड्, अदिती देशपांडे, किशोर कदम, स्मिता तांबे अशी तगडी स्टारकास्ट होती. तसेच मराठीतील अव्वल संगीतकाराची जोडी अजय-अतुल यांनी या चित्रपटाला संगीत दिले होते. या चित्रपटातील गाणी अजूनही लोकप्रिय झाली होती किंबहुना अजूनही आहेत.