'1942: अ लव स्टोरी' हा चित्रपटसृष्टीमधल्या काही सर्वोत्कृष्ट कलाकृतींपैकी एक. 1994 प्रदर्शित झालेला हा चित्रपट प्रेक्षकांनी उचलून धरण्यामागचं सर्वात मोठं कारण होतं ते म्हणजे आर. डी. बर्मन यांचे संगीत. या चित्रपटामधली सगळीच गाणी अजूनही प्रेक्षकांच्या मनावर रुंजी घालतात. आजची पिढी तर ती ऐकते आहेच, पण त्या गाण्यांचं माधुर्य इतकं आहे, की येणाऱ्या अनेक पिढ्यादेखील ती ऐकतील.
या चित्रपटाची गाणी तर सदाबहार होतीच, त्याचसोबत अनिल कपूर (Anil Kapoor), मनीषा कोईराला आणि इतर कलाकारांचा अभिनय सुद्धा तितकाच उत्कृष्ट होता. पण तुम्हाला माहित आहे का की अनिल कपूरने ही भूमिका आधी नाकारली होती? याबद्दल बोलताना अनिल कपूर सांगतात,''हा चित्रपट माझ्या कारकीर्दीमधली एकमेव लव स्टोरी आहे. मी या भूमिकेबाबत साशंक होतो. त्यामुळे मी नकारच दिला आणि त्यांना तसं सांगितलंही की मला अशा भूमिका जमणार नाहीत. मी तर त्यांना आमिर खान किंवा बॉबी देओलला घेण्याबाबतही सुचवलं होतं." (हेही वाचा. मुख्यमंत्रीपदाच्या ऑफरवर अनिल कपूर यांनी ट्विट करून दिले मजेशीर उत्तर)
अनिल कपूर पुढे म्हणतात,''मी त्यांना विचारलं की मी कुठल्या बाजूने तुम्हाला एक रोमँटिक हिरो वाटतो? कारण मी तीन मुलांचा बाप होतो. पण त्यांनी मला समजावलं. मीही स्वतःवर खूप मेहनत घेतली. वजन कमी केले. कपड्यांवर आवश्यक ती मेहनत घेतली. तो आजपर्यंतच्या सर्वोत्कृष्ट अशा रोमँटिक चित्रपटांपैकी एक आहे. 'एक लडकी को देखा तो ऐसा लगा' तसेच 'कुछ ना कहो' ही गाणी आजही लोकप्रिय आहेत. आता जेव्हा मी मागे वळून बघतो तेव्हा मला वाटतं की ती भूमिका दुसरं कोणी करूच शकलं नसतं. मला खूप अभिमान वाटतो मी ती भूमिका तेव्हा स्वीकारली."
ह्या चित्रपटाच्या आधीपर्यंत अनिल कपूर यांची प्रतिमा ही काहीशी अमिताभ यांच्या 'अँग्री यंग मॅन' सारखी होती. चाळिशीनंतर काहीशी उताराला लागलेली त्यांची कारकीर्द पुन्हा एकदा वर आणण्यामध्ये या चित्रपटाचा मोठा वाटा होता. हा चित्रपट सुपरहिट झाला आणि नंतर कपूर यांची दुसरी इंनिंग 'एक्सप्रेस वे' ला लागली.