The Kashmir Files: चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस यांनी भाजप आमदारांसोबत पहिला 'द काश्मीर फाइल्स' चित्रपट (Watch Video)
Chandrakant Patil, Devendra Fadnavis | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

सध्या देशभरात फक्त एकाच गोष्टीची चर्चा आहे ती म्हणजे 'द काश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) हा चित्रपट. याआधी पीएम नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक केंद्रीय नेत्यांनी हा चित्रपट पहिला होता. आता महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी इतर भाजप आमदार आणि पत्रकारांसह 'द काश्मीर फाइल्स' पाहिला. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्षांनी अभिनेत्री पल्लवी जोशी आणि दर्शन कुमार यांच्याशीही संवाद साधला. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्वीटर खात्यावर याचे फोटो शेअर केले आहेत.

याबाबत पत्रकारांशी संवाद साधताना फडणवीस म्हणाले, ‘या चित्रपट पाहून मी स्तब्ध आणि निशब्द झालो आहे. प्रत्येक भारतीयाने हा चित्रपट पहावा अशी माझी इच्छा आहे. जे स्वतःला धर्मनिरपेक्ष मानतात अशा लोकांनी तर हा चित्रपट पहावाच. जाणूनबुजून भारताच्या इतिहासातील काही पाने डिलीट करण्याचे काम या लोकांनी केले आहे. काश्मीरबाबतचे सत्य या चित्रपटाद्वारे समोर आले आहे. हा चित्रपट कोणत्याही धर्माविरोधात नाही, तर देशाविरोधात असलेल्या लोकांबाबत हा चित्रपट आहे.’

याबाबत चंद्रकांत पाटील म्हणतात, ‘सत्य दाखवणे हे कधीही सोपे नसते, त्यामुळे ‘द काश्मीर फाईल्स’ सिनेमाच्या संपूर्ण टीमचे मी कौतुक तसेच मनःपूर्वक अभिनंदन करतो!’

दरम्यान, महाराष्ट्रातील अनेक भाजप नेते संपूर्ण थिएटर बुक करून जनतेला हा चित्रपट दाखवत आहेत. हा चित्रपट पाहण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांना (कार्यकर्ते) तसेच त्यांच्या प्रभागातील आणि मतदारसंघातील लोकांना एकत्र केले जात आहे. गेल्या आठवड्यात राज्य विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान, भाजपने आपल्या 92 आमदारांच्या स्वाक्षरी असलेले एक निवेदन उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारला सादर केले आणि 11 मार्च रोजी रिलीज झालेल्या द काश्मीर फाइल्सला करमुक्त करण्याची विनंती केली. (हेही वाचा:  चंद्रकांत पाटील यांचे विचित्र वक्तव्य, म्हणाले 'बंटी पाटील माणसं खाणारा माणूस')

दुसरीकडे, 'द काश्मीर फाइल्स'ची क्रेझ दिवसेंदिवस वाढत असताना, उत्तर प्रदेशातील नवनिर्वाचित भाजप आमदारांनी आपापल्या मतदारसंघात लोकांसाठी मोफत शो आयोजित करण्यास सुरुवात केली आहे. उन्नावचे भाजप आमदार पंकज गुप्ता यांनी दोन दिवसांपूर्वी 31 मार्चपर्यंत एक थिएटर बुक केले आणि आपल्या मतदारांना चित्रपट मोफत पाहण्याची ऑफर दिली.