Mumbai Cruise Drugs Case: केंद्र सरकार NCB कडून मागवू शकते आर्यन खानशी संबंधित ड्रग्ज प्रकरण हाताळल्याबाबतचा अहवाल
Aryan Khan (Photo Credits: Instagram)

ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला एनसीबीने (NCB) मुंबईजवळील एका क्रूझवर छापा टाकत ड्रग्ज प्रकरणी (Drugs Case) शाहरुख खानचा (Shahrukh Khan) मुलगा आर्यन खानसह (Aryan Khan) इतरांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर आर्यन खानला जमीन मिळवून देण्यासाठी अनेक प्रयत्न घडले मात्र त्याला लवकर यश आले नाही. हे प्रकरण माध्यमांनी चांगलेच उचलून धरले होते. या प्रकरणावरून राजकीय वातावरणही चांगलेच तापले होते. आता केंद्रीय गृह मंत्रालय (MHA) शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचा सहभाग असलेल्या क्रुझ शिप ड्रग प्रकरणात झालेल्या अटकेच्या हाताळणीबाबत, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून अहवाल मागवण्याचा विचार करत आहे.

ही माहिती सूत्रांनी सोमवारी दिली. माहितीनुसार, मंत्रालयाने एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप आणि या ड्रग्ज प्रकरणात ज्याप्रकारे अटक करण्यात आली, त्याबाबत गंभीरपणे विचार केला आहे. सूत्रांनी असेही म्हटले आहे की, मंत्रालयाच्या उच्च अधिकार्‍यांनी काही गीष्टींवर आपला आक्षेप नोंदवला आहे. त्यातील एक म्हणजे, ज्याप्रकारे एनसीच्या तपासाचे तपशील माध्यमांसमोर लीक केले गेले त्यामुळे असे चित्र उभे राहिले की, आर्यन खान हा एक सेलिब्रिटीचा मुलगा असल्याने मुद्दाम टारगेट केला जात आहे. तसेच यामुळे असेही दिसून आले की, आर्यन खानला कोठडीत ठेवण्यासाठी एनसीबीकडे सबळ पुरावे नाहीत.

सूत्रांनी असेही सांगितले की, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हेही एनसीबीच्या अधिकाऱ्यांवर गेल्या आठवडाभरात घडलेल्या प्रकरणाबाबत नाराज होते आणि त्यांनी या प्रकरणातील तथ्य जाणून घेण्यासाठी मुंबईतील काही भाजप नेत्यांशी चर्चा केली. (हेही वाचा: 'इथून पुढे कधीही करणारा नाही OTT वर काम', अभिनेता Nawazuddin Siddiqui चा मोठा निर्णय; समोर आले धक्कादायक कारण)

दुसरीकडे, वानखेडे यांच्यावर लावण्यात आलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी एनसीबीने उत्तर विभागाचे उपमहासंचालक (डीडीजी) ज्ञानेश्वर सिंग यांच्या नेतृत्वाखाली पाच सदस्यीय तपास पथक स्थापन केले, ज्यांनी 27 ऑक्टोबर रोजी मुंबईतील एनसीबी झोन कार्यालयाला भेट दिली आणि समीर यांचा जबाब नोंदवून घेतला.