अक्षय कुमारचा Samrat Prithviraj ठरला सुपर फ्लॉप? 5 दिवसांत केवळ 48.60 कोटींची कमाई, अनेक ठिकाणी शो रद्द
Samrat Prithviraj (संग्रहित संपादित प्रतिमा)

सोनू सूद (Sonu Sood) आणि अक्षय कुमार (Akshay Kumar) स्टारर 'सम्राट पृथ्वीराज' (Samrat Prithviraj) कडून फक्त निर्मात्यांनाच नाही तर चाहत्यांनाही खूप आशा होत्या. मात्र प्रदर्शित झाल्याच्या पाचव्या दिवशी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर पूर्णपणे आपटला असल्याचे दिसत आहे. सुमारे 200-250 कोटींच्या बजेटमध्ये बनलेला हा पीरियड चित्रपट 5 दिवसांत केवळ 48.60 कोटी कमवू शकला आहे. एकीकडे चित्रपटाची कमाई अतिशय संथ आहे तर दुसरीकडे चाहते सोशल मीडियावर चित्रपटातील चुकीच्या गोष्टी आणि दृश्यांची खिल्ली उडवत आहेत.

'सम्राट पृथ्वीराज'च्या कमाईत मंगळवारी आणखी घसरण झाली. हा चित्रपट 5 दिवसांत 50 कोटींची कमाईही करू शकला नाही. इतकेच नाही तर प्रेक्षक संख्येअभावी अनेक ठिकाणी चित्रपटाचे शो रद्द करावे लागण्याची स्थिती निर्माण झाली आहे. मंगळवारी पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनावर बनलेल्या या चित्रपटाने अवघ्या 4.35 कोटींचा व्यवसाय केला आहे. सोमवारी त्याची कमाई 5 कोटी रुपये होती.

डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी दिग्दर्शित 'सम्राट पृथ्वीराज' चित्रपटातून मानुषी छिल्लरने पदार्पण केले आहे. अक्षय कुमार आणि संजय दत्तशिवाय सोन सूदसारखे स्टार्सही या चित्रपटात आहेत. पण चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांची संख्या केवळ 7-8 टक्के आहे. म्हणजेच 100 सीट्सपैकी केवळ 9 सीट्स भरत आहेत. बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, सम्राट पृथ्वीराजचे मॉर्निंग शो कमी उपस्थितीमुळे रद्द केले जात आहेत. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 10.75 कोटींचा व्यवसाय केला होता. पहिल्या वीकेंडला 16 कोटींची कमाई झाली. (हेही वाचा: कमल हसनने 'विक्रम'च्या यशाचा संबंध भाषेच्या वादाशी जोडला, म्हणाले- आता चांगल्या सिनेमाचा बोलबाला)

महत्वाचे म्हणजे तिकीट खिडकीवर 'सम्राट पृथ्वीराज'ला टक्कर देणारा सध्या एकही चित्रपट नाही. कमल हसनचा 'विक्रम' रिलीज झाला असला तरी त्याचा जोर दक्षिणेत जास्त आहे. 'मेजर' सुद्धा 'सम्राट पृथ्वीराज'ला हानी पोहोचेल असा बिझनेस करत नाही. मात्र कार्तिक आर्यनच्या 'भूल भुलैया 2' ने रिलीजच्या 19व्या दिवशीही 2 कोटींचा व्यवसाय केला आहे. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला असून त्याने 156.76 कोटींची कमाई केली आहे.