अभिनेत्री Rakul Preet Singh ची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; NCB अहवाल सादर करेपर्यंत, माध्यमांना आपल्या बातम्या प्रसारित न करण्याच्या सूचना देण्याची केली विनंती
या प्रकरणी बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर आणि रकुल प्रीत सिंह यांनाही एनसीबीने चौकशीसाठी बोलावले होते. रकुल प्रीत सिंहची चौकशी झाल्यांनतर आज दीपिका पदुकोण व श्रद्धा कपूर यांची चौकशी पार पडली.
सुशांत सिंह राजपूत मृत्युच्या (Sushant Singh Rajput's Death Case) तपासामध्ये सध्या एनसीबी (NCB) कडून ड्रग्ज प्रकरणामध्ये (Drug Angle) चौकशी सुरु आहे. या प्रकरणी बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर आणि रकुल प्रीत सिंह यांनाही एनसीबीने चौकशीसाठी बोलावले होते. रकुल प्रीत सिंहची चौकशी झाल्यांनतर आज दीपिका पदुकोण व श्रद्धा कपूर यांची चौकशी पार पडली. आता अभिनेत्री रकुल प्रीत सिंहने (Rakul Preet Singh) शनिवारी दिल्ली उच्च न्यायालयात संपर्क साधला. यावेळी तिने केंद्र, प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया आणि न्यूज ब्रॉडकास्टर असोसिएशनला माध्यमांनी कोणताही कार्यक्रम प्रसारित करू नये किंवा रिया चक्रवर्ती ड्रग प्रकरणात तिचा संबंध साधणारा कोणताही लेख प्रकाशित करू नये, यासाठी अंतरिम निर्देश मागितले.
नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो, मुंबई, तपास पूर्ण करेपर्यंत आणि न्यायालयात योग्य तो अहवाल दाखल करेपर्यंत, अभिनेत्रीने माध्यमांविरूद्ध अंतरिम आदेश मागितला आहे. प्रलंबित अर्जाअंतर्गत दाखल केलेला हा अर्ज पुढील आठवड्यात सुनावणीसाठी येण्याची शक्यता आहे. उच्च न्यायालयाने 17 सप्टेंबर रोजी रकुल सिंहचे नाव रिया चक्रवर्ती ड्रग प्रकरणाशी जोडले जाण्यापासून बंदी घालण्याच्या याचिकेवर, केंद्राचे उत्तर मागितले होते. ते म्हणाले होते की, ‘माध्यमांमध्ये लीक झालेल्या माहितीची चौकशी होणे आवश्यक आहे, कारण यामुळे कोणाचीही प्रतिष्ठा पूर्णपणे नष्ट होण्याची शक्यता आहे.’
अर्जामध्ये रकुल म्हणाली की, ‘ती चित्रपटाच्या शूटिंगसाठी हैदराबादमध्ये होती. त्यानंतर 23 सप्टेंबर रोजी संध्याकाळी ड्रग खटल्याच्या संदर्भात एनसीबीने दुसर्या दिवशी सकाळी तिला मुंबईत हजर होण्यास समन्स बजावले. हे वृत्त ऐकून तिला धक्का बसला.’ तिला हैदराबादच्या पत्त्यावर किंवा मुंबईच्या पत्त्यावर समन्स मिळालेले नव्हते त्यामुळे ती हैदराबादमध्येच थांबली. त्याचवेळी रकुल हैदराबादमध्ये असताना, एनसीबीच्या चौकशीसाठी ती 23 सप्टेंबर रोजी संध्याकाळी मुंबईला पोचली असावी असे गृहीत धरून त्या अर्थाच्या बातम्या माध्यमांनी प्रसारित केल्या. त्यानंतरही रकुल विरोधात बनावट बातम्या प्रसारित करणे माध्यमांनी सुरूच ठेवले होते.
एएनआय ट्वीट -
17 सप्टेंबर रोजी उच्च न्यायालयानेही सर्व अधिकाऱ्यांना रकुलच्या याचिकेकडे प्रतिनिधित्त्व म्हणून पाहण्यास सांगितले होते. तसेच 15 ऑक्टोबर रोजीच्या पुढील सुनावणी पर्यंत त्यावर निर्णय घेण्यास सांगितले होते. रकुलने आपल्या याचिकेत दावा केला आहे की, रिया चक्रवर्तीने ज्या आरोपात आपले नाव घेतले होते त्याबद्दलचे वक्तव्य मागे घेतल्यानंतरही मिडिया ड्रग प्रकरणामध्ये तिचे नाव जोडत आहेत. (हेही वाचा: अभिनेत्री दीपिका पादुकोण पाच तासांच्या चौकशीनंतर अखेर NCB कार्यालयातून बाहेर पडली, ड्रग्ज प्रकरणाबाबत झाली चौकशी)
दुसरीकडे असेही निदर्शनास आले आहे की, एनसीबी कार्यालयात चौकशीसाठी पोहोचताना किंवा तिथून परत येताना मीडियाकर्मी लोकांच्या वाहनांचा पाठलाग करत आहेत. आज दीपिका पदुकोणच्या गाडीचा पाठलाग होतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर पोलिस आता अशा घटनांमध्ये कठोर कारवाई करण्याचा विचार करीत आहेत. याबाबत मुंबई पोलिसांचे डीसीपी झोन वन संग्रामसिंह निशंदर म्हणाले, ‘आज (शनिवारी) आपण पाहिले आहे की, मीडियाची अनेक वाहने चौकशीसाठी येणाऱ्या लोकांचा पाठलाग करीत आहेत. जर असे पुढे आढळल्यास अशी वाहने जप्त केली जातील. कारण मिडियाच्या अशा वागण्यामुळे सामान्य लोकांचे जीवनही धोक्यात येत आहे.’