Uttarakhand Electric Vehicle Accident: राजाजी राष्ट्रीय उद्यान व्याघ्र प्रकल्पात इलेक्ट्रिक वाहनाचा मोठा अपघात; चार वन अधिकाऱ्यांचा मृत्यू, 4 जण जखमी (Watch Video)
Accident (PC - File Photo)

Electric Vehicle Accident: उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) एक मोठी दुर्घटना घडली आहे. राजाजी राष्ट्रीय उद्यान व्याघ्र प्रकल्पाला (Rajaji Tiger Reserve) देण्यात आलेल्या नवीन इलेक्ट्रिक वाहनाची (Electric Vehicle) चाचणी सुरू असताना अचानक टायर फुटला आणि गाडी झाडावर आदळली. त्यामुळे त्यात प्रवास करणाऱ्या दोन वन अधिकाऱ्यांसह चौघांचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी याबाबत माहिती दिली. लक्ष्मणझुला पोलीस स्टेशनचे प्रभारी रवी कुमार सैनी यांनी सांगितले की, अपघातात एक महिला वन अधिकारी वाहनातून बाहेर आल्यानंतर चिल्ला कालव्यात पडून बेपत्ता झाली. हा अपघात ईव्हीच्या डॅशबोर्ड कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला आहे.

चिल्ला वीज केंद्रासमोर वनविभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारे वाहन झाडावर आदळल्याने ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून आठ जणांना ऋषिकेश येथील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये नेले. त्यापैकी चौघांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. अपघाताबाबत चालकाने सांगितले की, गाडी ओव्हरलोड होती आणि त्याला वेग वाढवण्यास भाग पाडले गेले. त्याने सांगितले की, चाचणी दरम्यान तो मद्यधुंद किंवा थकलेला नव्हता.

अपघाताच्या एका दिवसानंतर, इलेक्ट्रिक वाहन स्टार्टअप प्रवाग डायनॅमिक्सने मंगळवारी सांगितले की ते या प्रकरणाबद्दल अधिक माहिती देण्यासाठी तपास यंत्रणांसोबत काम करत आहेत. बेंगळुरूस्थित कंपनी प्रवाग डायनॅमिक्सने एका प्रेस निवेदनात या दुर्घटनेबद्दल दु:ख आणि तीव्र शोक व्यक्त केला आहे. वाहनाचे प्रात्यक्षिक सुरू असताना हा अपघात झाला. (हेही वाचा: 2024 Bajaj Chetak Electric Launched In India: भारतात लॉन्च झाली 2024 बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटर; जाणून घ्या फीचर्स आणि किंमत)

उत्तराखंड वनविभागाने मंजूर केलेली पहिली चाचणी मोहीम सोमवारी सकाळी कोणत्याही अडथळ्याशिवाय पार पडली. मात्र दुपारी प्रात्यक्षिकाच्या दुसऱ्या फेरीत वन अधिकाऱ्यांनी 9 जणांना (चालकासह एकूण 10) नेण्यास भाग पाडले. गाडीची आसनक्षमता आठ होती. हे इलेक्ट्रिक वाहन असल्याने, त्याचा प्रवेग खूपच वेगवान आहे. चिखल आणि धोकादायक खडक असलेल्या अस्थिर रस्त्यांमुळे गाडीचा टायर फुटला आणि वाहनावरील नियंत्रण सुटले.